छाननीत राजकीय पक्षांसह अपक्षांना बसले धक्के; बाद अर्जसंख्या पाहून उमेदवारांना फुटला घाम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:52 IST2026-01-01T12:50:45+5:302026-01-01T12:52:50+5:30
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीत बुधवारी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी १- अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३, ४ ...

छाननीत राजकीय पक्षांसह अपक्षांना बसले धक्के; बाद अर्जसंख्या पाहून उमेदवारांना फुटला घाम!
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीत बुधवारी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी १- अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३, ४ आणि ५ मधील उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुरू करण्यात आली. तासाभरातच काही उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरू लागली. अनेक तांत्रिक कारणांमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज रद्द करण्यास सुरुवात केली. राजकीय पक्षांसह अपक्षांना बसणारे हे धक्के पाहून बाहेर बसलेल्या अन्य उमेदवारांना ऐन थंडीतही घाम फुटला. दुपारी ४ वाजेपर्यंत तीन प्रभागांतील अनेक उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले.
एमआयएम पक्षाला धक्का
एमआयएम पक्षाने प्रभाग क्र. ३ मधून प्रांतोष वाघमारे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्जही भरला. अर्जासोबत सूचक आणि अनुमोदकाचे नाव, प्रारूप मतदार यादीतील टाकले. अंतिम मतदार यादीत सूचक, अनुमोदकाचे नाव दुसऱ्या प्रभागात गेले. त्यामुळे त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रूपा चित्रक यांनी रद्द ठरविला. एमआयएम पक्षासाठी हा मोठा धक्का होता. पक्षातील काही नेते, तज्ज्ञ मंडळींनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे बराच वेळ आपली बाजू मांडली. मात्र, अधिकारी निर्णयावर ठाम होते.
उद्धवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज बाद
प्रभाग क्रमांक ४ मधून उद्धवसेनेने सावित्री वाणी यांना उमेदवारी दिली. अर्जासोबत पक्षाचा बी-फाॅर्मही जोडलेला होता. अर्जातील एक शपथपत्र नोटरी करून दिलेले हवे होते. वाणी यांनी साध्या छापील कागदावर शपथपत्र दिले. हा अर्जही बाद ठरविण्यात आला. सावित्री वाणी आणि त्यांच्यासोबतच्या अन्य उमेदवारांनी, पक्षाच्या नेत्यांनी बराच वेळ चर्चा केली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय कायम ठेवला. तथापि, त्यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज कायम आहे.
वादविवाद वाढला
एका उमेदवाराचा अर्ज बाद ठरविल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पठाण आणि उमेदवाराच्या सर्मथकांमध्ये चांगलाच वाद झाला. त्याचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला. यात उमेदवार समर्थकांनी पठाण यांच्यावर काही आरोप केले.