वर्षातील शेवटच्या दिवशी इच्छुकांचा राजकीय सूर्य मावळला; छ. संभाजीनगरात ९७ अर्ज बाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:14 IST2026-01-01T12:12:58+5:302026-01-01T12:14:42+5:30
प्रभागातील अ, ब, क आणि ड प्रवर्गानुसार छाननीची प्रक्रिया सुरू होताच, एकानंतर एक धक्के राजकीय पक्षांना बसायला सुरुवात झाली.

वर्षातील शेवटच्या दिवशी इच्छुकांचा राजकीय सूर्य मावळला; छ. संभाजीनगरात ९७ अर्ज बाद
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीत बुधवारी शहरातील नऊ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांत सकाळी ११ ला उमेदवारी अर्जांची छाननी सुरू झाली. प्रभागातील अ, ब, क आणि ड प्रवर्गानुसार छाननीची प्रक्रिया सुरू होताच, एकानंतर एक धक्के राजकीय पक्षांना बसायला सुरुवात झाली. बी-फाॅर्म लावलेल्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज बाद होऊ लागले. पक्षांच्या दृष्टीने अत्यंत ‘धुरंधर’ असलेल्या उमेदवारांचे अर्ज अत्यंत छोट्या-छोट्या कारणांवरून बाद झाले. दिवसभरात तब्बल ९७ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने त्यांचा सरत्या वर्षातील शेवटच्या दिवशी राजकीय सूर्यही मावळला.
मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. राजकीय पक्षांनी सर्वच इच्छुकांना उमेदवारी दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शहरातील सर्वच नऊ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये अर्ज भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. दिवसभरात १८७० अर्ज दाखल झाले. बुधवारी सकाळी ११ वाजता एकाच वेळी छाननीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. उमेदवार आणि त्यांचे समर्थक आपल्या प्रभागातील प्रवर्गाचा क्रमांक कधी येईल, याची वाट पाहत होते. प्रवर्गनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर छाननी करण्यात आली. त्यात अनेक दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात येऊ लागले. उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी वाद घालू लागले. काही उमेदवारांनी आपल्या विरोधी उमेदवारांवर आक्षेप दाखल केले. त्याची सुनावणी घेण्यात येऊ लागली. त्यामुळे अनेक ठिकाणी सायंकाळी ५ तर काही ठिकाणी रात्री ८ वाजेपर्यंत वाद सुरू होते. वादविवादानंतर अधिकारी अंतिम निर्णय घेत होते.
अर्ज बाद का झाले ?
उमेदवारी अर्ज भरताना अनेक गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. बाद झालेल्या उमेदवारांनी काळजी घेतलेली नव्हती. काहींना नियम माहीत नव्हते. शपथपत्र साध्या कागदावर दिले. नोटरी केलेल्या शपथपत्रावर सह्या नाहीत. सूचक-अनुमोदकाचे नाव अंतिम मतदार यादीत नाही. कोणाचे वय कमी पडले. जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर ते पडताळणीसाठी दिल्याची पावती हवी. अशा अनेक चुकांमुळे अर्ज बाद ठरले.
कोणत्या प्रभागातून किती अर्ज बाद ?
झोन क्रमांक ----------- प्रभाग क्रमांक -------------- बाद संख्या -------- वैध अर्ज
०१ ----------------- ३, ४, ५ --------------- ३३ -------------- १५७
०२ ------------------ १५, १६, १७ --------------- ०५ ------------- २०३
०३ ----------------- ६, १२, १३, १४ ------------ ०७ ------------- १६४
०४ ------------------ १, २, ७ -------------- ०६ -------------- १७६
०५ ----------------- ८, ९, १०, ११ ------------ १३ -------------- २२०
०६ ----------------- २३, २४, २५ --------------- १० -------------- १९४
०७ ----------------- २१, २२, २७ --------------- १५ -------------- २२१
०८ ----------------- २६, २८, २९ --------------- ०३ --------------- १९६
०९ ----------------- १८, १९, २० ---------------- ०५ -------------- १८९
एकूण ----------------------------------------- ९७ ---------------- १७२०
उद्या अर्ज मागे घेता येणार
निवडणूक रिंगणात आता कोण आहेत, हे स्पष्ट झाले. राजकीय पक्षांचे उमेदवार तर उमेदवारी मागे घेणार नाहीत. अपक्षांची मनधरणी करून त्यांना माघार घेण्यासाठी विनवण्या गुरुवारपासून सुरू होतील. २ जानेवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीतील लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. ३ जानेवारी रोजी अपक्षांना चिन्ह वाटप करण्यात येईल.