आता लढायचेच! छत्रपती संभाजीनगरात दोन दिवसांत ३ हजार १७० अर्जांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 16:17 IST2025-12-25T16:16:35+5:302025-12-25T16:17:06+5:30
महापालिका निवडणूक २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना संसर्ग, आरक्षणाचा पेच आदी अनेक कारणांमुळे निवडणूक रखडत गेली.

आता लढायचेच! छत्रपती संभाजीनगरात दोन दिवसांत ३ हजार १७० अर्जांची विक्री
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या रणसंग्रामात उतरण्यासाठी इच्छुकांनी चांगलीच कंबर कसल्याचे दिसते आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या दुसऱ्या दिवशी तब्बल १३५४ अर्ज इच्छुकांनी नेले. दोन दिवसांत ३ हजार १७० अर्जांची विक्री झाली. एकेका उमेदवाराने दोन ते तीन अर्ज खरेदी केले. पुढील तीन ते चार दिवसांत अर्ज विक्रीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणूक २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना संसर्ग, आरक्षणाचा पेच आदी अनेक कारणांमुळे निवडणूक रखडत गेली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत पाच वर्षे प्रशासकीय राजवट होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका होत आहेत. २३ डिसेंबरपासून निवडणुकीसाठी अर्ज विक्री सुरू झाली. पहिल्याच दिवशी शहरातील नऊ निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून १८१६ अर्ज विक्रीला गेले. दुसऱ्या दिवशी १३५४ अर्ज गेल्याची माहिती देण्यात आली. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच अर्ज विक्री करण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय उघडताच अर्ज घेण्यासाठी इच्छुक आणि त्यांचे समर्थक गर्दी करीत आहेत. सिल्लेखाना येथील महापालिका झोन कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता वाहतूक कोंडी झाली होती. या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करावे लागले.
इच्छुक म्हणतात माघार नाहीच...
२०१५ च्या मनपा निवडणुकीत अनेक इच्छुकांचा पराभव झाला. २०२० मध्ये संधी मिळेल असे अनेकांना वाटत होते. मात्र, वाट पाहण्यात आणखी पाच वर्षे निघून गेले. तब्बल दहा वर्षांनंतर अनेक इच्छुकांना निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतून माघार नाहीच. लढायचे म्हणजे लढायचेच असा निर्धार करीत अनेक इच्छुकांनी बुधवारी अर्ज नेले.
तिकीट मिळो किंवा ना मिळो....
प्रभाग पद्धतीत राजकीय पक्षाच्या उमेदवारीने निवडणूक लढणे सोपे जाईल, असे अनेकांना वाटत आहे. अपक्ष निवडणूक लढविणे कोणालाही सोपे नाही. तिकिटासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावून ठेवली आहे. तिकीट न मिळाल्यास पर्यायी पक्षांकडून उमेदवारी मिळविणे, तेसुद्धा शक्य न झाल्यास अपक्ष लढण्यावर अनेकजण ठाम आहेत.
कोणत्या प्रभागातून किती अर्ज विक्री
प्रभाग -------------अर्ज संख्या ---------- कार्यालय
३, ४, ५ ------------१६५ ------ स्मार्ट सिटी कार्यालय (घनकचरा विभाग)
१५, १६, १७ ---------१०७ ------ झोन-२ कार्यालय, सिल्लेखाना
६, १२, १३, १४ ------१२८ ------- उपविभागीय कार्यालय (तहसीलच्या शेजारी)
१, २, ७ ------------८३ ------- मनपा झोन-४ कार्यालय, टीव्ही सेंटर
८, ९, १०, ११-------१०४ -------- गरवारे स्टेडियमजवळ, आयटी पार्क
२३, २४, २५ --------२०३ -------- मनपा झोन-६ कार्यालय, सिडको
२१, २२, २७ -------३०९ -------- विभागीय क्रीडा संकुल, मिशन लक्ष कार्यालय
२६, २८, २९ --------१३३ -------- मनपा झोन-८ कार्यालय, सातारा परिसर
१८, १९, २०--------१२२ --------- मनपा झोन-९ कार्यालय, जालना रोड.