'तडजोड नाहीच! ४१ जागा द्या नाहीतर स्वतंत्र लढू!' संजय शिरसाटांचा भाजपला खणखणीत इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 13:32 IST2025-12-29T13:30:40+5:302025-12-29T13:32:58+5:30
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महायुतीचं गणित बिघडलं? उमेदवारी अर्ज भरायला एकच दिवस बाकी, पण भाजपचा प्रस्ताव गायब

'तडजोड नाहीच! ४१ जागा द्या नाहीतर स्वतंत्र लढू!' संजय शिरसाटांचा भाजपला खणखणीत इशारा
छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना महायुतीमधील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे. "आम्ही ४१ जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यावर तडजोड करणार नाही. भाजपला युती करायची असेल तर ठीक, अन्यथा आम्ही स्वतंत्र लढायला तयार आहोत," अशा शब्दांत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे.
भाजपच्या प्रतिसादाकडे डोळे
गेल्या ८-९ बैठका होऊनही भाजपकडून अद्याप कोणताही ठोस प्रस्ताव आलेला नाही. स्थानिक भाजप नेते सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याची तक्रार शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. "आम्ही आमच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत आणि त्यांना अर्ज भरण्यास सांगितले आहे. युती झाली तर ठीक, नाहीतर आमची तयारी पूर्ण आहे," असे शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
विरोधकांवर तिखट वार
यावेळी शिरसाट यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. "आम्ही बंड केलं म्हणून राऊतांना बोलायला जागा उरली आहे," असे म्हणत त्यांनी राऊतांचा समाचार घेतला. तसेच, ठाकरे गट मुस्लिम उमेदवारांना संधी देत असल्याच्या प्रश्नावर, "उद्धव सेना आता 'उबाठा मामू' झाली असून त्यांना मतांच्या बेरीजेशिवाय काहीही दिसत नाही," असा टोला त्यांनी लगावला. राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबतही त्यांनी यावेळी मिश्किल भाष्य केले.