मनपाची ‘एक खिडकी योजना’ बंदच; अखेर परवानगीशिवायच गणेशोत्सवासाठी मंडप उभारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:25 IST2025-08-19T17:19:21+5:302025-08-19T17:25:02+5:30

महापालिकेने तातडीने ‘एक खिडकी योजना’ कार्यान्वित करावी, अशी मागणी गणेश मंडळांकडून होत आहेत.

Municipal Corporation's 'One Window Scheme' still closed; Finally, construction of pavilions for Ganeshotsav begins without permission | मनपाची ‘एक खिडकी योजना’ बंदच; अखेर परवानगीशिवायच गणेशोत्सवासाठी मंडप उभारणी

मनपाची ‘एक खिडकी योजना’ बंदच; अखेर परवानगीशिवायच गणेशोत्सवासाठी मंडप उभारणी

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आला तरी महापालिकेची परवानगी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ‘एक खिडकी योजना’ यावर्षी अद्याप सुरूच झालेली नाही. यामुळे मंडळांचे मंडप उभारणीचे काम ठप्प असून, सजावटीसह इतर नियोजनात अडथळे आले आहे. जुन्या मंडळांनी मात्र परवानगीची वाट न पाहता मागील वर्षीच्या परवानगीचा आधार घेत मंडप उभारणी सुरू केली.

गणेशोत्सवाच्या तयारीसाठी अगोदरच वेळ अपुरा पडतो. त्यात परवानगी प्रक्रियेत उशीर झाल्यास मंडप सजावटीपासून कार्यक्रम आखणीपर्यंतची सर्व कामे विस्कळीत होतात. त्यामुळे महापालिकेने तातडीने ‘एक खिडकी योजना’ कार्यान्वित करावी, अशी मागणी गणेश मंडळांकडून होत आहेत.

का होतोय उशीर?
सर्व गणेश मंडळांना परवानगीसाठी मनपा, पोलिस आयुक्तालय, महावितरण, धर्मदाय सहआयुक्त कार्यालय अशा वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात जावे लागते. वेळ व पैसा खर्च होत असल्याने मागे महानगरपालिकेतील टाऊन हॉलमध्ये ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात आली. मात्र, दरवर्षीप्रमाणे ऐन वेळेवर परवानगी देण्याची प्रथा प्रशासनाने यंदाही कायम ठेवली आहे.

कोणता विभाग, कशाची देते परवानगी
१) मनपा - खासगी जागेवर गणपती मूर्ती बसविणार असाल तर त्या जागा मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, मागील वर्षाचे परवानगीपत्र, मनपाच्या जागेवर मंडप उभारण्यात येत असेल तर त्याची परवानगी मनपाच देते.
२) महावितरण - जेथे मंडप उभारणार तेथील मनपाचे परवानगीपत्र, तसेच शेजारी रहिवाशांचे लाईट बिल द्यावे लागते. यावरून तात्पुरते वीज मीटर दिले जाते.
३) पोलिस आयुक्तालय - महानगरपालिका व महावितरणचे परवानगीपत्र द्यावे लागते. त्यानंतर पोलिस आयुक्तालय परवानगी देते.
४) अग्निशमन दलाची परवानगी - मंडप उभारणी करताना अग्निरोधक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी अग्निशमन दलाची परवानगी घ्यावी लागते.

सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष, सचिव यांच्या आधार कार्डची झेरॉक्स, मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या नावाची यादी मनपा, पोलिस आयुक्तालयात द्यावी लागते.

१०० पेक्षा अधिक मंडळांचे अर्ज
वर्गणी जमा करण्यासाठी धर्मदाय सहआयुक्तालयाची परवानगी लागते. या विभागाने ऑनलाइन तसेच ऑफलाइन अर्ज स्वीकारणे सुरू केले. आजपर्यंत १०० पेक्षा अधिक मंडळाने परवानगीसाठी अर्ज दिले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे-मुंबईत दोन महिने आधीच प्रक्रिया
मुंबई-पुणे या महानगरात जून महिन्यापासूनच सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी देणे सुरू होते. यामुळे तेथे मंडप उभारणी व देखावे तयार करायला पुरेसा वेळ मिळतो. शहरात २१ ऑगस्टपासून मनपा ‘एक खिडकी योजना’ सुरू करणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गणेश मंडळांना कधी परवानगी मिळणार, कधी मंडप उभारणार आणि कधी देखावा तयार करणार? याचा गांभीर्याने विचार प्रशासनाने करावा.
- लक्ष्मीनारायण राठी, सचिव, नवसार्वजनिक गणेश मंडळ, गांधी पुतळा चौक

Web Title: Municipal Corporation's 'One Window Scheme' still closed; Finally, construction of pavilions for Ganeshotsav begins without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.