एमआयएम-काँग्रेस राडा: काँग्रेस उमेदवार हबीब कुरेशी, कलीम कुरेशीसह ५० जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 14:24 IST2026-01-08T14:23:57+5:302026-01-08T14:24:22+5:30
प्रसंगावधान राखून पोलिसांकडून लाठीचार्ज; पाेलिसांसह एकमेकांवर अंडे फेकले, २५ मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात

एमआयएम-काँग्रेस राडा: काँग्रेस उमेदवार हबीब कुरेशी, कलीम कुरेशीसह ५० जणांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : एमआयएम व काँग्रेसचे उमेदवार प्रचार रॅलीत समोरासमोर येऊन बुधवारी दुपारी १.३० वाजता खासगेट परिसरात राडा झाला. यात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना मारहाण करून वाहनाचा पाठलाग करण्यात आला. पोलिसांनी वेळीच लाठीचार्ज केल्याने परिस्थिती नियंत्रणात येत मोठा अनुचित प्रकार टळला. याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी रात्री काँग्रेसचे उमेदवार हबीब कुरेशी, त्यांचे भाऊ कलीम कुरेशी यांच्यासह ५० जणांच्या जमावावर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी शासनातर्फे फिर्यादी होत गुन्हा नोंदवला. एमआयएमचे उमेदवार फेरोज खान मोईनोद्दीन (रा. बक्कलगुडा, शहागंज) यांनी ७ जानेवारी रोजी प्रभाग १४ मध्ये परवानगी घेऊन बायजीपुरा ते नवाबपुरा चौका दरम्यान पायी प्रचार रॅली काढली होती. सकाळी १० वाजता त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली. त्यात माजी खासदार इम्तियाज जलील हे देखील सहभागी झाले. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास अचानक जिन्सी चौकातून काँग्रेसचे कलीम कुरेशी, हबीब कुरेशी, शकील कुरेशी, आवेज शकील यांच्यासह ४० ते ५० जणांचा जमाव रस्त्यावर आला.
हातवारे, घोषणाबाजी, अंडे फेकले
-प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दोन्ही गट समोरासमोर येताच जमावातील तरुण एकमेकांना पाहून हातवारे, घोषणाबाजी करत होते. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी सर्वांना घरी जाण्याचे आवाहन केले. मात्र, जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
-दोन्ही गट एकमेकांवर चालून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, जिन्सीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत व अन्य पोलिस त्यांना अडवण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते.
-जमावाने एकमेकांना शिवीगाळ सुरू केल्याने तणाव वाढला. जमाव पोलिसांच्या हाताबाहेर गेला. एकमेकांवर धावून जात मारहाण सुरू झाली. काही व्यापाऱ्यांनी तत्काळ दुकानांचे शटर बंद केले.
काही क्षणांत जमावातून अज्ञातांनी एकमेकांवर अंडे फेकण्यास सुरुवात केली. पोलिसांवरही अंडे फेकण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दोन वेळेस शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, जमावाने ऐकले नाही. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनाचा पाठलाग करुन त्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसांनाच धक्काबुक्की सुरू झाल्याने बुधवत यांनी सहकाऱ्यांसह जमावावर लाठीचार्ज केला. त्यानंतर जमाव पांगून परिस्थिती नियंत्रणात आली.
या कलमान्वये गुन्हा दाखल
शासनाच्या वतीने पोलिस अंमलदार शेख शफिक मसलोद्दीन यांच्या तक्रारीवरुन बीएनएस १३२ ( सरकारी कामात हस्तक्षेप), १८९-२ (बेकायदेशीर जमाव), १९१-२(दंगा करणे), १९०(बेकायदेशीर जमाव), १२६-२(गैरकृत्य), ११५-२(इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे), ३५२ (शांतताभंग घडवून आणण्यासाठी अपमानित करणे), ३५१-२,३ (धाकपटशाही) सह कलम महाराष्ट्र पोलिस अधिनियम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक अरुणा घुले यांच्याकडे याप्रकरणाचा तपास सोपवण्यात आला.