हर्सूलमध्येच एमआयएमविरोधात पडली होती असंतोषाची ठिणगी, त्यानंतर झाला इम्तियाज जलीलांच्या वाहनावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 19:47 IST2026-01-08T19:46:28+5:302026-01-08T19:47:15+5:30
एमआयएम-काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने; 'असा' झाला इम्तियाज जलीलांच्या वाहनावर हल्ला

हर्सूलमध्येच एमआयएमविरोधात पडली होती असंतोषाची ठिणगी, त्यानंतर झाला इम्तियाज जलीलांच्या वाहनावर हल्ला
छत्रपती संभाजीनगर : एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील बुधवारी दुपारी ०१:३० वाजेच्या सुमारास जिन्सी भागात प्रभाग क्रमांक १४ मधील आपल्या उमेदवारांसह पदयात्रेसाठी पोहोचले. पदयात्रा काही अंतरावर गेल्यानंतर समोरून काँग्रेसचे उमेदवार कलीम कुरैशी समर्थकांसह आले. एमआयएम- काँग्रेसचा मोठा गट समोरासमोर आला. एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. इम्तियाज जलील एका काळ्या रंगाच्या चारचाकीतून निघत असताना काही तरुणांनी त्यांच्या वाहनावरच हल्ला चढविला. या घटनेनंतर जिन्सी भागात तणाव निर्माण झाला होता.
एमआयएम पक्षाने २२ माजी नगरसेवकांचे तिकीट कापले. त्याचप्रमाणे तिकीट न मिळालेले पक्षातील कार्यकर्तेही नाराज आहेत. एमआयएमविरोधात अनेक ठिकाणी असंतोष उफाळून आला आहे. मंगळवारी हर्सूल गावात उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी इम्तियाज जलील गेले असताना काही कार्यकर्त्यांनी ‘तुम्हारा हमारा रिश्ता क्या, १४ लाख, १५ लाख’ अशा घोषणा दिल्या. एमआयएमविरोधातील असंतोषाची ठिणगी याच ठिकाणी पडली होती. बुधवारी दुपारी पदयात्रेसाठी इम्तियाज जलील जिन्सी भागात पोहोचले.
पदयात्रा थोड्या अंतरावर पुढे जाताच काँग्रेसचे उमेदवार कलीम कुरैशी समर्थकांसह पोहोचले. दोन्ही गट आमनेसामने येताच पोलिसांनी दोघांनाही रोखले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी जमाव प्रक्षोभक होत असल्याचे लक्षात येताच सौम्य लाठीमार केला. प्रकरण अधिक चिघळत असल्याने जलील हे पदयात्रा अर्धवट सोडून काळ्या रंगाच्या कारमध्ये बसून निघाले. काँग्रेस समर्थक तरुणांनी वाहनाचा पाठलाग करून हल्ला चढविला. जलील यांच्या सुरक्षेसाठी कारच्या बाहेर लटकणाऱ्या तरुणांना मारहाण करण्यात आली. घटनेनंतर सिटीचौकच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी घटनास्थळी दाखल झाल्या. जिन्सी भागात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
एमआयएम उमेदवाराची माघार
प्रभाग क्रमांक १४ मध्ये एआयएम पक्षाने चार जणांना उमेदवारी दिली. त्यातील परवीन कैसर खान या माजी नगरसेविकेने निवडणुकीतून माघार घेतली. त्यांनी अर्ज मागे घेतल्यापासून या प्रभागात काँग्रेसविरुद्ध एमआयएम, असा वाद विकोपाला गेला आहे. काँग्रेसने या प्रभागात एक उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न केला होता.