छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी महाविकास आघाडीचा निर्णय उद्या जाहीर होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 14:39 IST2025-12-26T14:37:01+5:302025-12-26T14:39:35+5:30
उद्धवसेना, राष्ट्रवादी-शप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत चर्चा

छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी महाविकास आघाडीचा निर्णय उद्या जाहीर होणार
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडी संबंधाने जो काही निर्णय होईल, तो शनिवारी (दि. २७) जाहीर करण्यात येईल, असे शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसुफ यांनी सांगितले.
काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीसाठी ते मुंबईला गेले आहेत. ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीशी पाच-सहा जागांवर आमची बोलणी थांबली आहे. उद्धवसेनेबरोबरही काही जागांवर बोलणी थांबली आहे. उद्या ती पूर्ण करून अंतिम निर्णय घेणार आहे.
मुंबईतल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरातही उद्धवसेना आणि मनसे एकत्र येऊन महापालिका निवडणूक लढवणार असेल तर मग उद्धवसेनेबरोबर आमची बोलणी होणार नाही, असेही शेख युसुफ यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी (शरद पवार) चे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना पक्षनेते शरद पवार यांनी तातडीने पुण्याला बोलावून घेतल्यामुळे ते गुरुवारी छत्रपती संभाजीनगरात येऊ शकले नाहीत. ते शुक्रवारी (दि. २६) येणार आहेत.
राष्ट्रवादी (शरद पवार) ची व उद्धवसेनेची काल सायंकाळी जागावाटपावर चर्चा झाली. उर्वरित चर्चा पुन्हा होणार आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी (शरद पवार) ला वीस जागा मिळाल्या तरी आम्ही समाधानी राहू, असे या राष्ट्रवादी (शरद पवार) चे शहराध्यक्ष ख्वाजाभाई शरफोद्दीन यांनी सांगितले.