संजना सोडून महायुतीचे सर्व नेते, जनता माझ्यासोबत: हर्षवर्धन जाधव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 18:31 IST2024-11-18T18:17:44+5:302024-11-18T18:31:47+5:30
कन्नडचा कारभार हा कन्नडमधूनच चालला पाहिजे, भोकरदनमधून नाही, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.

संजना सोडून महायुतीचे सर्व नेते, जनता माझ्यासोबत: हर्षवर्धन जाधव
कन्नड : संजना सोडून मतदारसंघातील सर्व जनता व महायुतीचे सर्व नेते माझ्यासोबत आहेत. कारण मी त्यांना परवडणारा आहे, असे प्रतिपादन कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी रविवारी नागापूर येथील प्रचार सभेत केले.
या सभेत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव म्हणाले, महायुतीत चांगले उमेदवार असताना त्यांना डावलून दुसऱ्याला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे संजना सोडून महायुतीतील राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार नितीन पाटील, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, शिंदेसेनेचे तालुकाप्रमुख केतन काजे यांच्यासह तालुक्यातील सर्व जनता माझ्यासोबत आहेत. त्यामुळे माझा विजय निश्चित असून, मी आयुष्यभर शेतकरी व तरुणांसाठी काम करणार आहे. आजपासून तीन दिवस-रात्र महत्त्वाची आहे. मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी होणार असून, मतदारांनी त्यांच्या पैशाला हुरळून जाऊ नये, नाहीतर तालुक्याचे मोठे नुकसान होईल, असेही जाधव म्हणाले.
कन्नडचा कारभार हा कन्नडमधूनच चालला पाहिजे, भोकरदनमधून नाही, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. त्यामुळे जनतेने ही निवडणूक हाती घेतली असून, मलाच मोठ्या मताधिक्याने जनता निवडून देणार, असा माझा ठाम विश्वास आहे, असेही जाधव म्हणाले.