महापालिका निवडणुकीत उमेदवाराला एका मतदान केंद्राला तीन वेळाच भेट देता येईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:05 IST2026-01-10T13:04:09+5:302026-01-10T13:05:13+5:30
तीन नागरिकांचे मतदान होईपर्यंतच कक्षात थांबण्याची मुभा

महापालिका निवडणुकीत उमेदवाराला एका मतदान केंद्राला तीन वेळाच भेट देता येईल
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी गुरुवार, दि. १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक रिंगणात ८५९ उमेदवार आहेत. मतदानाच्या दिवशी उमेदवाराला कोणत्याही मतदान केंद्रावर दिवसभरातून फक्त तीन वेळेसच जाता येईल. यापेक्षा अधिक फेऱ्या मारता येणार नाहीत. मतदानाच्या ठिकाणी तीन मतदारांनी मतदान करण्यासाठी जेवढा वेळ लागेल, तेवढ्याच वेळापर्यंत कक्षात थांबता येईल. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणालाही मोबाइल वापरता येणार नाही. वापरल्यास मोबाइल जप्त केला जाईल, असे पोलिस आयुक्त प्रवीण पवार, मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी राजकीय मंडळींना एका बैठकीत सांगितले.
स्मार्ट सिटी कार्यालयात शुक्रवारी दुपारी पोलिस प्रशासन व विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. बैठकीस पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, मनपा प्रशासक जी. श्रीकांत, निवडणूक विभागप्रमुख विकास नवाळे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, सहायक आयुक्त ऋतुजा पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जी. श्रीकांत यांनी बैठकीत सांगितले की, मतमोजणी केंद्रांवर बसण्यासाठी जागेची मर्यादा असल्याने प्रत्येक नोंदणीकृत राजकीय पक्षाने प्रत्येक पॅनलसाठी एकच प्रतिनिधी नियुक्त करणे योग्य राहील. पोलिस आयुक्तांनी सांगितले की, ज्या उमेदवारांना रॅली, सभा किंवा अन्य कार्यक्रमांच्या वेळी अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता असेल, त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येईल. एअर बलून किंवा ड्रोनचा वापर पोलिस परवानगीशिवाय करू नये. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांत असल्याने नायलॉन मांजाचा वापर कोणीही करू नये, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले. त्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा होत असल्याने कार्यक्रमाच्या स्थळी कोणत्याही उमेदवाराचा किंवा राजकीय पक्षाचा प्रचार, भेटवस्तूंचे आदान - प्रदान तसेच राजकीय बॅनर्स लावण्यास बंदी राहील. उमेदवारांनी उपस्थित केलेले काही प्रश्न आणि समस्यांचे निरसनही यावेळी करण्यात आले.