एक गाव, त्याला दोन आमदार; दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची गावात वाढली लगबग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 17:54 IST2024-11-11T17:53:07+5:302024-11-11T17:54:33+5:30
दोन आमदार आणि दोन खासदार असलेले हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.

एक गाव, त्याला दोन आमदार; दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची गावात वाढली लगबग
- यादवकुमार शिंदे
सोयगाव : तालुक्यातील निमखेडी-उमर विहिरे-तिखी ग्रुप ग्रामपंचायत हे गाव सिल्लोड-सोयगाव आणि कन्नड-सोयगाव या दोन विधानसभा मतदारसंघांत विभागले गेले असून, या गावामध्ये प्रचारासाठी दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची दररोज लगबग वाढली आहे.
सोयगाव तालुका सिल्लोड व कन्नड या दोन विधानसभा मतदारसंघांत आणि लोकसभेला जालना व औरंगाबाद या दोन लोकसभा मतदारसंघांत विभागला गेला आहे. सिल्लोड मतदारसंघातील शेवटचे गाव असलेल्या उमर विहिरे गावातील एकाच ग्रामपंचायतीला मतदान करणाऱ्या एकूण ९७२ मतदारांपैकी वॉर्ड क्र. ३ मधील २९८ मतदारांचा सिल्लोड मतदारसंघात, तर वॉर्ड क्र. १ आणि २ मधील ६७४ मतदारांचा कन्नड मतदारसंघात समावेश करण्यात आला आहे. वॉर्ड क्र. तीन हा तिखीचा असून यामध्ये १५४ पुरुष आणि १४४ महिला मतदार आहेत. हे मतदार सिल्लोड मतदारसंघाला जोडले आहेत; तर निमखेडी वॉर्ड क्र. १ मधील १९७ पुरुष आणि १८२ महिला असे ३७९ व उमर विहिरेमधील १५४ पुरुष आणि १४१ महिला असे दोन्ही प्रभागातील ६७४ मतदार हे कन्नड विधानसभा मतदारसंघाला जोडले आहेत. त्यामुळे या गावाला दोन आमदार व दोन खासदार आहेत. दोन आमदार आणि दोन खासदार असलेले हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.
मतदान केंद्रे वेगवेगळी
कन्नड व सिल्लोड या दोन विधानसभा मतदारसंघांत या ग्रामपंचायतीचे मतदार समाविष्ट केल्याने या गावांतील तिन्ही प्रभागांत वेगवेगळ्या ठिकाणी तीन मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यांतील एक मतदान केंद्र सिल्लोडसाठी, तर दोन मतदान केंद्रे कन्नडसाठी आहेत.
उमेदवारांची ओळख करणे झाले कठीण
एकच ग्रामपंचायतीसाठी असलेल्या मतदारांची दोन विधानसभा मतदारसंघांत विभागणी केल्याने सिल्लोड आणि कन्नड या दोन्ही मतदारसंघांतील सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार या गावात येऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत; मात्र उमेदवारांनाच त्यांचा मतदार कोणता हेच लवकर कळत नाही. या उमेदवारांची कोंडी होत आहे.