दोन्ही पक्षांत 'इनकमिंग' वाढल्याने भाजप-शिंदेसेना युतीला विलंब; ९ बैठकानंतरही निर्णय नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:52 IST2025-12-29T12:52:02+5:302025-12-29T12:52:38+5:30
मनसे आणि उद्धवसेना यांच्यात युती झाली असली तरी त्यांच्यामध्ये वर्चस्वावरून वाद सुरू

दोन्ही पक्षांत 'इनकमिंग' वाढल्याने भाजप-शिंदेसेना युतीला विलंब; ९ बैठकानंतरही निर्णय नाही
छत्रपती संभाजीनगर : शिंदेसेना भाजपमध्ये जागावाटपासाठी ९ बैठका झाल्या. आता किरकोळ जागांवर अंतिम चर्चा सुरू आहे. महापालिकेवर भगवा फडकवण्याचे दोन्ही पक्षांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दोन्ही पक्षांत प्रवेश करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने जागावाटपाचा निर्णय घेण्यास थोडा वेळ लागत आहे. आज किंवा उद्या निर्णय होईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिंदेसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी रविवारी (दि. २८) पत्रकारांना सांगितले. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, मनसे आणि उद्धवसेना यांच्यात युती झाली असली तरी त्यांच्यामध्ये वर्चस्वावरून वाद सुरू असल्याचे शिरसाट यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
पुण्यात शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी पक्ष घेईल. तसेच त्यांची कोणी कोंडी करत असेल तर त्यावर उपायही आमच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी एकत्र नाही, काँग्रेसचा विषय वेगळा आहे, शरद पवार महाविकास आघाडीसोबत लढणार का, हादेखील प्रश्न असल्याचे शिरसाट यांनी नमूद केले.
दरम्यान, एमआयएम, बसप, राष्ट्रवादी अजित पवारने काही प्रभागातील उमेदवारांच्या याद्या जाहीर करून बाजी मारली आहे. भाजप, शिंदेसेना, काँग्रेस, उद्धवसेनेकडून अद्याप काहीही पत्ते ओपन झालेले नाहीत.
अर्ज भरण्यासाठी होणार गर्दी
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचा निर्णय झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्व कार्यालयांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. ४,७२० उमेदवारी अर्जाची विक्री झालेली आहे. फक्त १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २९ प्रभागांतन अ, ब, क, ड या आरक्षणानुसार ११५ वॉर्डासाठी उमेदवारी अर्ज दाखल होतील. चार वॉर्डाचा एक प्रभाग आहे. सोमवारी आणि मंगळवारी अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या अंतिम आकड्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल. दरम्यान सोमवारी आणि मंगळवारी आठ ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्यांची गर्दी नियंत्रित करता-करता प्रशासनाला नाकीनऊ येणे शक्य आहे.
प्लॅन बी तयार
आतापर्यंत फक्त १७ अर्ज दाखल झालेले आहेत. महापालिका निवडणूक लढविण्यास अनेक जण सज्ज असले तरी राजकीय पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर न केल्याने पक्षासह अपक्षांनीही उमेदवारी दाखल करणे टाळले आहे. प्रत्येक उमेदवारांनी आपला प्लॅन बी तयार ठेवल्याचे यावरून दिसते आहे.
वकिलांची कार्यालये गजबजली
रविवारी अनेक ठिकाणी वकिलांकडे उमेदवारी अर्ज भरून घेण्यासाठी इच्छुकांची गर्दी होती. सर्व एनओसी, स्थावर-जंगम मालमत्ता, आधार, पॅनकार्ड, आयकर विभागाचे वार्षिक विवरण पत्र, चारित्र्य प्रमाणपत्रांसह इतर कागदपत्रे घेऊन उमेदवार वकिलांच्या कार्यालयात तासनतास बसून होते.