"इम्तियाज जलील हा भाजपाचा हस्तक, त्याने शहराला..."; ठाकरेंच्या नेत्याचा घणाघात, फडणवीसांवरही 'बाण'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 15:09 IST2026-01-09T15:07:34+5:302026-01-09T15:09:07+5:30
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निमित्ताने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. तिकीट वाटपापासून शहरातील निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे.

"इम्तियाज जलील हा भाजपाचा हस्तक, त्याने शहराला..."; ठाकरेंच्या नेत्याचा घणाघात, फडणवीसांवरही 'बाण'
छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा प्रचार सुरू असून, राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडत आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला करण्यात आला. याच हल्ल्यानंतर राजकारण तापले असून उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यावर हल्ला चढवला. इम्तियाज जलील हे भाजपाचे हस्तक आहेत, असा आरोप दानवेंनी केला आहे.
अंबादास दानवे म्हणाले, "इम्तियाज जलील हे भाजपाचे हस्तक आहेत. त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहराला व्यसन लावले आहे. काळे धंदे करणारा हा व्यक्ती पैशाच्या बळावर आणि सत्ताधाऱ्यांच्या जीवावर निवडून येतो."
"आमची लढत थेट भाजपा आणि शिंदे गटाशी आहे. इम्तियाज जलील यांच्याशी आमची कोणतीही राजकीय लढत नाही. उलट शिंदे गटात एकमेकांविरोधात आव्हाने निर्माण झाली असून, त्यांच्यातच संघर्ष सुरू आहे", असे अंबादास दानवे म्हणाले.
दानवेंची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टॉक शो छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला. त्यावरूनही अंबादास दानवे यांनी टीकेचे बाण डागले. "काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टॉक शो नव्हता, तर फेक शो होता. शहराबद्दल ते बोललेच नाहीत. फडणवीसांनी सभा घ्यायला हवी होती. भाजपा या सभेपासून पळून गेली आणि टॉक शो केला", अशी टीका त्यांनी केली.
"फडणवीसांनी त्यांचीच स्क्रिप्ट बदलावी. भाषणात ते सर्व सारखंच बोलतात, फक्त शहराचे नावे बदलतात. बाकी सर्व सारखंच असतं. समृद्धीच्या जमिनीबद्दल आम्ही अडवलं नसतं, तर त्यांनी जमिनी लुटून घेतल्या असत्या. आम्ही शेतकऱ्यांना पाचपट भाव मिळवून दिला. जमिनी देण्यासाठी विरोध नव्हता, तर चांगला मोबदला द्यावा यासाठी होता", असेही दानवे म्हणाले.