कार्यकर्त्यांपासून पळताय म्हणजे तुम्हीच चूक केलीये!; भाजपमधील राड्यावर शिरसाटांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:18 IST2026-01-01T14:17:24+5:302026-01-01T14:18:14+5:30
"भाजपनेच जाणीवपूर्वक युती तोडली!" शिरसाटांनी पुरावे दाखवत भाजपच्या 'मोठ्या भावा'च्या भूमिकेवर उठवले प्रश्नचिन्ह.

कार्यकर्त्यांपासून पळताय म्हणजे तुम्हीच चूक केलीये!; भाजपमधील राड्यावर शिरसाटांचे टीकास्त्र
छत्रपती संभाजीनगर: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप करत युती तुटण्यास त्यांनाच जबाबदार धरले. "भाजपने युती तोडण्याची धारणा आधीच केली होती, त्यांनी मुद्दाम खोड मारली आणि मुख्यमंत्र्यांचेही ऐकले नाही," असे खळबळजनक विधान शिरसाट यांनी यावेळी केले.
कार्यकर्त्यांपासून पळू नका!
भाजप कार्यालयात झालेल्या राड्यावर भाष्य करताना शिरसाट म्हणाले की, "ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस पक्षाचे झेंडे घेऊन काम केले, त्यांना तुम्ही डावलू शकत नाही. जर तो उमेदवारी मागत असेल तर त्यात गैर काय? नेत्यांनी कार्यकर्त्यांना सामोरे गेले पाहिजे, त्यांच्याशी बोलले पाहिजे. तुम्ही त्यांच्यापासून पळ काढत असाल, तर तुमचीच चूक आहे." कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणे ही नेतृत्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
ठाकरे आणि राऊतांवर टीकास्त्र
संजय राऊत यांच्या पैशांच्या आरोपांवर शिरसाट यांनी कडाडून टीका केली. "राऊतांना फक्त कोटींच्या गप्पांचे स्वप्न पडत आहे. यांनी लोकसभेत तिकिटे विकली, हे पक्ष विकायला निघालेले लोक आहेत," असा टोला त्यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरेंच्या सभेच्या कार्यपद्धतीवर बोलताना, "मुंबई तुमची प्रॉपर्टी नाही, ती सर्वांची आहे," असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
विकास हाच अजेंडा
"लोकांना तुमच्या राजकीय वादाशी काहीही देणं-घेणं नाही. त्यांना पाणी आणि रस्ते हवे आहेत. पाण्याचे श्रेय कोणीही घ्या, पण लोकांना पाणी मिळाले पाहिजे," असे म्हणत त्यांनी निवडणुकीचा मूळ मुद्दा विकासाचाच असल्याचे स्पष्ट केले. संभाजीनगरमध्ये आता युती होणे शक्य नसून, आता प्रयत्न करणे म्हणजे 'डोकेफोडी'चे काम असल्याचे म्हणत त्यांनी स्वबळाचा नारा अधिक गडद केला.