बिल वसुलीत अडथळा आणणाऱ्या नेत्यांची तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे, महावितरणचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 17:53 IST2026-01-06T17:52:53+5:302026-01-06T17:53:36+5:30
राजकीय दबावाला महावितरण जुमानणार नाही; पोलिसांच्या बंदोबस्तात वीज बिल वसुली जोरात

बिल वसुलीत अडथळा आणणाऱ्या नेत्यांची तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे, महावितरणचा इशारा
छत्रपती संभाजीनगर : महावितरणने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून सुरू केलेल्या ‘मिशन नाइन्टी डेज' या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेने वेग घेतला आहे. एका वर्षापासून एक रुपयाचेही वीजबिल न भरलेल्या ग्राहकांवर या मोहिमेत प्राधान्याने कारवाई करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका असून, काही ठिकाणी उमेदवारांचे नाव सांगून कार्यकर्ते वीजबिल वसुलीस विरोध करत आहेत. अशा उमेदवारांची नावे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.
वीजबिल वसुलीत अडथळे आणणाऱ्यांवर तसेच महावितरण कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण करणाऱ्यांवर थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे महावितरणने म्हटले आहे. थकबाकी वसुली करताना काही संवेदनशील भागांत कर्मचाऱ्यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता, ही कारवाई पोलिस बंदोबस्तात होणार आहे. कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता ही मोहीम अधिक वेगाने होणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर काहीजण शेजाऱ्यांकडून बेकायदेशीररीत्या वीजपुरवठा घेतात. असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल करून अनधिकृत वीज देणाऱ्या शेजाऱ्याचा वीजपुरवठा खंडित केला जाईल. एखाद्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित ग्राहकाचे शहरात दुसरे कनेक्शन असल्यास त्यावर थकबाकी वळवली जाईल.
पाच २ हजार जणांचे काढले मीटर
गेल्या ५ दिवसांत छत्रपती संभाजीनगर शहरात जवळपास दीड हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला. तर २ हजार जणांचे मीटर काढून त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला.