राज्यात ‘उत्सव पर्यटन’, पर्यटनस्थळेच नव्हे तर सणांसाठीही येणार परदेशी पर्यटक
By संतोष हिरेमठ | Updated: September 8, 2022 18:53 IST2022-09-08T18:52:48+5:302022-09-08T18:53:17+5:30
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची जगभरात ओळख व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

राज्यात ‘उत्सव पर्यटन’, पर्यटनस्थळेच नव्हे तर सणांसाठीही येणार परदेशी पर्यटक
औरंगाबाद : पर्यटन विभागामार्फत देशातील पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटक राज्यात यावेत यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. 'उत्सव पर्यटन' हा त्याचा एक भाग असून भविष्यात सर्व प्रकारच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची जगभरात ओळख व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने विविध देशांच्या मुंबई स्थित महावाणिज्य दूतांना मानाच्या गणपतींचे दर्शन घडविण्यात आले. पहिल्या टप्प्यात विविध दहा देशांतील महावाणिज्य दूतांना गणरायांचे दर्शन घडविण्यात आले होते.
दुसऱ्या टप्प्यात १५ देशांतील महावाणिज्य दूतांनी वडाळा येथील जीएसबी गणेश मंडळ, लालबाग येथील गणेश गल्ली आणि लालबागचा राजा, गिरगाव येथील मोहन बिल्डिंग तसेच लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सर्वात जुन्या केशवजी नाईक चाळ येथील गणेशांचे दर्शन घेतले. सर्व गणेश मंडळांच्यावतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात येऊन त्यांना उत्सवाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल आदी उपस्थित होते.
मुंबईपाठोपाठ आता राज्यभर ‘उत्सव पर्यटन’ला चालना मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. गणशोत्सव, नवरात्र, दिवाळी अशा विविध सणाच्या निमित्ताने देश-विदेशातील पर्यटक ऐतिहासिक स्थळांबरोबर उत्सवानिमित्त राज्यात येतील,असा विश्वास व्यक्त होत आहे.