'त्यांच्या' सभांना गर्दी होईलही, पण मतदान भाजपलाच; चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:20 IST2026-01-10T12:19:36+5:302026-01-10T12:20:09+5:30
उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांच्या काळात शहराच्या पाणी योजनेचे काम बंद पाडले, अन्यथा आज चित्र वेगळे असते

'त्यांच्या' सभांना गर्दी होईलही, पण मतदान भाजपलाच; चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंना टोला
छत्रपती संभाजीनगर: "छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला आहे. विकासाचे दुसरे नाव म्हणजे फडणवीस, असे नाते महाराष्ट्राशी जुळले आहे. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांच्या काळात शहराच्या पाणी योजनेचे काम बंद पाडले, अन्यथा आज चित्र वेगळे असते," अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.
पाणी आणि मालकी हक्काचा प्रश्न मार्गी
बावनकुळे म्हणाले की, नवीन पाणी योजनेची यशस्वी चाचणी झाली असून आगामी दोन महिन्यांत शहराला पाणी मिळणार आहे. तसेच, शहरातील अनेक नागरिकांकडे पीआर कार्ड (मालकी हक्क) नसल्याने, आता ड्रोन सर्वेक्षणाद्वारे शहराचा नवीन नकाशा तयार करून हा प्रश्न कायमचा निकाली काढला जाईल. अंबादास दानवे यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, केवळ टाक्या बांधून उपयोग नाही, पाण्याचा मुख्य स्त्रोत तयार करणे महत्त्वाचे आहे.
राजकीय समीकरणे आणि एमआयएम
अकोटमध्ये एमआयएमशी झालेल्या युतीवर स्पष्टीकरण देताना बावनकुळे म्हणाले, "आम्ही कधीही एमआयएमसोबत जाणार नाही. स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेली ती चूक होती, तो गट आम्ही तात्काळ रद्द केला आहे." तसेच गणेश नाईक आणि महायुतीमधील इतर वादांवर आम्ही चर्चेतून मार्ग काढू, कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. रश्मी शुक्ला यांनी मांडलेल्या अहवालात तथ्य असून जे रेकॉर्डवर आहे तेच त्यांनी मांडल्याचे समर्थनही त्यांनी केले.