बाजारात ईव्हीएम मशीन अवघ्या १२० रुपयांना; मतदानाच्या आधी डेमोसाठी उमेदवारांकडून खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:48 IST2026-01-13T15:44:58+5:302026-01-13T15:48:39+5:30
यंदा प्रथमच वॉर्डऐवजी प्रभाग रचना लागू झाल्याने एका प्रभागातून चार नगरसेवकांची निवड करायची आहे.

बाजारात ईव्हीएम मशीन अवघ्या १२० रुपयांना; मतदानाच्या आधी डेमोसाठी उमेदवारांकडून खरेदी
छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाला अवघे दोन दिवस उरले असतानाच शहरातील बाजारात ईव्हीएम मशीन विक्रीला आल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, या ईव्हीएम अवघ्या १२० रुपयांना विकल्या जात असून त्या विविध राजकीय पक्षांचे उमेदवारच खरेदी करत आहेत. हे वाचून अनेकांना धक्का बसणे साहजिक आहे. मात्र, हे पूर्ण सत्य नसून अर्धसत्य आहे.
कारण, या ईव्हीएम खऱ्या नसून डमी स्वरूपातील आहेत. मतदान प्रक्रिया समजावून देण्यासाठी आणि मतदारांमधील संभ्रम दूर करण्यासाठी या मशीनचा वापर केला जात आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाषण, आश्वासने आणि आरोप-प्रत्यारोप बाजूला पडले असून आता ‘बटण कसे दाबायचे’ यावरच प्रचाराचा भर आहे.
यंदा प्रथमच वॉर्डऐवजी प्रभाग रचना लागू झाल्याने एका प्रभागातून चार नगरसेवकांची निवड करायची आहे. पूर्वी एका उमेदवाराला मत देणाऱ्या मतदारांसाठी ही पद्धत नवी आहे. निवडणूक आयोग आणि प्रशासनाने जनजागृतीचे प्रयत्न केले असले, तरी चार बटणांपैकी कोणते आणि किती बटण दाबायचे, याबाबत मतदारांमध्ये संभ्रम आहे.
हाच संभ्रम दूर करण्यासाठी उमेदवारांनी थेट बाजारात विक्रीस आलेल्या डमी ईव्हीएम मशीन खरेदी करून मतदार जागृतीचा नवा मार्ग स्वीकारला आहे. या मशीनमध्ये प्रत्यक्ष मतदानाची कोणतीही व्यवस्था नसून त्या केवळ प्रात्यक्षिकासाठी वापरल्या जात आहेत. बाजारात साधारण १२० रुपयांत उपलब्ध असलेल्या या डमी ईव्हीएमना प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मोठी मागणी आहे. ईव्हीएमबाबतचे गैरसमज दूर करणे, हाच या उपक्रमाचा उद्देश असल्याची माहिती निवडणूक साहित्य विक्रेते राम माळोदे यांनी दिली.
पुठ्ठ्याची ‘ईव्हीएम’
डमी ईव्हीएम मशीन पुठ्ठ्यापासून बनविलेल्या आहेत. प्रत्येक ईव्हीएममध्ये १६ रिकामे रकाने असून, निवडणूक आयोगाने दिलेल्या क्रमांकानुसारच उमेदवारांनी आपले नाव व चिन्हाचे स्टीकर त्यावर चिकटवित आहेत. संबंधित उमेदवाराच्या नावासमोरील बटण दाबताच लाल दिवा चमकतो. या डमी ईव्हीएमवर ‘ही डमी बॅलेट युनिट असून, केवळ मतदार जागृतीसाठी आहे, असा स्पष्ट उल्लेख आहे.
कुठून आल्या डमी ईव्हीएम?
शहरात निवडणूक साहित्याचे पाच घाऊक विक्रेते असून, त्यापैकी चौघांनी या मशीन आणल्या आहेत. काही दिल्ली व मध्य प्रदेशातून, तर काही स्थानिक पातळीवरच तयार करून विक्रीस आणल्या आहेत.
५०० पेक्षा अधिक डमी ईव्हीएम बाजारात
होलसेलरनी बाजारात ५०० पेक्षा अधिक डमी ईव्हीएम मशीन आणल्या असून, त्यातील ४५० आधीच विकल्या गेल्या आहेत. मंगळवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने सोमवारी अनेक उमेदवारांनी मतदार जागृतीसाठी या मशीन खरेदी केल्या.