उद्धवसेनेत वाद! छ. संभाजीनगरात रशीद मामूंच्या उमेदवारीवरून खैरे-दानवे आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:08 IST2026-01-01T13:03:21+5:302026-01-01T13:08:58+5:30
उद्धवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात समन्वय नसल्याचे बुधवारी समोर आले.

उद्धवसेनेत वाद! छ. संभाजीनगरात रशीद मामूंच्या उमेदवारीवरून खैरे-दानवे आमनेसामने
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी उद्धवसेनेने तब्बल ९९ उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. परंतु, या उमेदवारी देताना उद्धवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात समन्वय नसल्याचे बुधवारी समोर आले. "उमेदवारी ठरवताना मला विचारले गेले नाही," असा खळबळजनक दावा खैरेंनी केला आहे, तर दानवे यांनी "सर्व निर्णय शिवसेना भवनातून पक्षप्रमुखांच्या संमतीने झाले," असे म्हणत खैरे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
रशीद मामूंच्या प्रवेशावरून ठिणगी
या वादाचे मुख्य केंद्र ठरले आहेत माजी महापौर रशीद मामू. दानवे यांनी रशीद मामूंचा मुंबईत नेऊन पक्षप्रवेश केला आणि त्यांना उमेदवारीही जाहीर केली. यावर खैरे प्रचंड संतापले आहेत. "रशीद मामूंच्या उमेदवारीमुळे ५० हजार हिंदू मतांचा फटका पक्षाला बसणार आहे. दानवे यांनी मला अंधारात ठेवून हा निर्णय घेतला," अशा शब्दांत खैरेंनी आपली नाराजी व्यक्त केली.
'सगळं काही पक्षप्रमुखांच्या आदेशाने'
खैरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले की, "रशीद मामूंचा प्रवेश स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करून घेतला आहे. उमेदवार निवडीसाठी जेव्हा मुलाखती झाल्या, तेव्हा खैरे तिथे स्वतः उपस्थित होते. त्यामुळे मनमानीचा आरोप करणे चुकीचे आहे." खैरे ज्येष्ठ नेते असले तरी पक्षप्रमुखांचा आदेश अंतिम असल्याचे सांगत दानवेंनी चेंडू पुन्हा खैरेंच्या कोर्टात टाकला आहे. या अंतर्गत संघर्षामुळे निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.