छ. संभाजीनगरात ५९२ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; सर्वपक्षीय अहंकाराला मतदारांचा लगाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:56 IST2026-01-20T17:52:51+5:302026-01-20T17:56:47+5:30
राष्ट्रवादीच्या ७८ पैकी तब्बल ७४ उमेदवारांना अनामत रक्कमही वाचवण्यात अपयश

छ. संभाजीनगरात ५९२ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; सर्वपक्षीय अहंकाराला मतदारांचा लगाम
-ज्ञानेश्वर भाले
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीने केवळ सत्तासंघर्षच नाही, तर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवार निवडीच्या धोरणांची परीक्षा घेतली. या महासंग्रामात मतदारांनी थेट कौल देत अनेक पक्षांना आरसा दाखवल्याचे निकालातून समोर आले. यात सर्वाधिक फटका बसला तो राष्ट्रवादीच्या (अजित पवार) उमेदवारांना. त्यांनी उभ्या केलेल्या ७८ उमेदवारांपैकी तब्बल ७४ उमेदवारांना त्यांचे डिपॉझिटही वाचवता आले नाही. यासह इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांना सुद्धा मतदारांनी नाकारल्याचे पुढे आले.
बहुतांश पक्षांनी संघटनात्मक गणिते, गटबाजी आणि वरून लादलेले चेहरे या निवडणुकीत मतदारांसमोर ठेवले. परिणामी, पक्षचिन्ह असूनही संबंधित उमेदवारांना मतदारांचा विश्वास मिळवता आला नाही. ही बाब स्थानिक पातळीवरील पक्ष नेतृत्वाच्या अपयशावर थेट बोट ठेवणारी आहे. अपक्ष उमेदवारांची झालेली दयनीय अवस्था आणि ‘नोटा’ला मिळालेला प्रतिसाद हे मतदारांची अस्वस्थता यातून दिसली. त्यामुळे महापालिकेच्या महासंग्रामात राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, उद्धवसेना, शिंदेसेना, भाजप आणि एमआयएमच्या उमेदवारांनासुद्धा याचा फटका बसला. उमेदवारांची डिपॉझिट जप्ती म्हणजे मतदारांचा संताप असून, पक्षीय अहंकाराला लगाम घालणारा हा महापालिकेचा निकाल ठरला.
९७४ पैकी ५९२ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
या महापालिका निवडणुकीत विविध राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. यात एकूण ९७४ उमेदवारांपैकी ५९२ जणांचे डिपॉझिट जप्त झाले.
राष्ट्रवादीला (अजित पवार) आत्मपरीक्षणाची वेळ
या निवडणुकीत राष्ट्रवादीने (अजित पवार) उभ्या केलेल्या ७८ उमेदवारांपैकी तब्बल ७४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. संबंधित आकडा पक्षाच्या स्थानिक पातळीवरील पकड, संघटनात्मक ताकद आणि उमेदवार निवडीच्या निकषांवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा आहे.
राष्ट्रीय पक्षांनाही धक्का
काँग्रेसच्या ७१ पैकी ५६, भाजपच्या १५ उमेदवारांनाही फटका बसला. उद्धवसेनेच्या ४७ तर शिंदेसेनेचे ३७ उमेदवार डिपॉझिट वाचवू शकले नाहीत. सत्ता, संघटना आणि प्रचार असूनही मतदारांचा विश्वास मिळवण्यात संबंधित पक्ष अपयशी ठरल्याचे या निवडणुकीतून पुढे आले.
वंचित, एमआयएमची मर्यादा उघड
वंचित बहुजन आघाडीच्या ६२ पैकी ४५, तर एमआयएमच्या ४९ पैकी ७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. या दोन्ही पक्षांचा मात्र, काही प्रभागात प्रभाव दिसून आला.
अपक्षांना पूर्ण अपयश
या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची अवस्था सर्वाधिक दयनीय ठरली. २१३ पैकी २१० अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. विशेष म्हणजे गत निवडणुकीत (२०१५) तब्बल १८ नगरसेवक अपक्ष म्हणून महापालिकेच्या सभागृहात होते. मात्र, २०२६ च्या निवडणुकीत एकाही अपक्ष उमेदवाराला आपला प्रभाव पाडता आला नाही.
‘नोटा’चा इशारा
मनपाच्या या रणसंग्रामात तब्बल ६५,८७७ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. संबंधित आकडा मतदारांतील उमेदवारांविषयी असलेली नाराजी, पर्यायांचा अभाव आणि पक्षीय राजकारणाबाबत वाढत असलेली उदासीनता दर्शवणारा ठरला.
लहान पक्षांचा सफाया
बसप, रासप, आप, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन सेना, भापक, मापक, आरपीआय (डी) आदी पक्षांनी उभ्या केलेल्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. महापालिकेच्या राजकारणात या पक्षांची मर्यादा पुन्हा एकदा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट केली.
पक्षनिहाय उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
पक्ष --- लढलेल्या जागा --- डिपॉझिट जप्त
रा. (अजित पवार) --- ७८ --- ७४
रा. (शरद पवार) --- २२ --- २०
काँग्रेस --- ७१ --- ५६
वंचित --- ६२ --- ४५
उद्धवसेना --- ९६ --- ४८
शिंदेसेना --- ९६ --- ३७
एमआयएम --- ४९ --- ७
भाजप --- ९२ --- १५
अपक्ष --- २१३ --- २१०