प्रचाराचा गुलाल उडाला, पण प्रभाग पद्धतीवरून मतदार 'कन्फ्युज', ४ मते कशी द्यायची?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:21 IST2026-01-06T14:20:01+5:302026-01-06T14:21:40+5:30
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभाग पद्धतीवरून ९० टक्के मतदार संभ्रमात!

प्रचाराचा गुलाल उडाला, पण प्रभाग पद्धतीवरून मतदार 'कन्फ्युज', ४ मते कशी द्यायची?
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार आणि अपक्षांनी प्रचाराचा धूमधडाका लावला आहे. बहुतांश उमेदवारांनी पदयात्रा, रॅली, डोअर टू डोअर मतदारांच्या भेटीवर भर दिला आहे. प्रभागासाठी आपण काय करणार? याचे पत्रक मतदारांच्या हाती देऊन ते पुढे निघून जात आहेत. मात्र, दि. १५ जानेवारी रोजी मतदान कसे करायचे, हे कोणीही सांगायला तयार नाही. चार वेळेस मतदान कसे करायचे, यावर ९० टक्के मतदार गोंधळात असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत निदर्शनास आले.
महापालिकेची निवडणूक तब्बल दहा वर्षांनंतर होत आहे. त्यामुळे मतदारांमध्येही कमालीची उत्सुकता आहे. शहरात पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने मतदान होणार आहे. ही प्रक्रिया नेमकी कशी असते हे बहुतांश मतदारांना माहीतच नाही. मतदान केंद्रात गेल्यावर पहिले मत एका पक्षाच्या उमेदवाराला दिले. दुसरे मत दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला दिले. तिसरे आणि चौथे मत अन्य कोणाला द्यायचे असेल तर काय करायचे. यावर मतदार प्रचंड गोंधळलेल्या स्थितीत असल्याचे दिसून आले. अनेक मतदारांना तर आपला प्रभाग क्रमांक कोणता हेच माहीत नाही. आपले मतदान केंद्र कुठे हे सुद्धा माहीत नाही.
निवडणुकीत प्रचारासाठी दिवस अत्यंत कमी आहेत. त्यात प्रभाग खूपच मोठे असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांपर्यंत पोहोचायचे कसे? असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. अनेक उमेदवारांच्या प्रचाराची भिस्त फक्त सोशल मीडियावरील रील्सवर अवलंबून आहे. उमेदवार आपल्या प्रभागातील मतदारांना मतदान कुठे आणि कसे करायचे हे सुद्धा सांगायला तयार नाहीत. अनेक मतदार म्हणतात, मला दोन किंवा तीनच मतं द्यायची आहेत, एक द्यायचेच नाही, तर काय करावे? असे एक ना अनेक प्रश्नांनी मतदारांच्या मनात शंका दाटून आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने मतदान जनजागृती केली आहे. मात्र, ही जनजागृती तोकडी पडत असल्याचे दिसून येते. आणखी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे.
या प्रश्नांवरून संभ्रम:
प्रभाग पद्धत काय आहे?
चार मते का द्यायची?
चार मशीन का असणार आहेत?
एका मशीनवर चार बटणं दाबली किंवा फक्त २-३ मतं दिली तर मत रद्द होईल का?
आपल्या पक्षाचे चार उमेदवार कोणत्या प्रभागात, कोणत्या मशीनवर आणि कोणत्या क्रमांकावर आहेत हे लक्षात कसं ठेवायचं?
ज्येष्ठ किंवा कमी शिक्षीत मतदारांना हे कसे समजावून सांगायचे?