छ. संभाजीनगर मनपा निवडणुकीचं चित्र क्लिअर! ८५९ उमेदवार मैदानात, ५५४ जणांची माघार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 19:30 IST2026-01-02T19:28:29+5:302026-01-02T19:30:07+5:30
विविध तांत्रिक कारणांमुळे ९७ अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत.

छ. संभाजीनगर मनपा निवडणुकीचं चित्र क्लिअर! ८५९ उमेदवार मैदानात, ५५४ जणांची माघार
छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची प्रक्रिया आज ( दि. २ ) पूर्ण झाली असून निवडणुकीचे अंतिम चित्र आता समोर आले आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार, एकूण ५५४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत, तर विविध तांत्रिक कारणांमुळे ९७ अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. यामुळे आता शहरातील विविध प्रभागांमध्ये एकूण ८५९ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.
प्रभागनिहाय महत्त्वाच्या घडामोडी:
सर्वाधिक माघार: प्रभाग २१, २२, २७ मध्ये सर्वाधिक ९१ उमेदवारांनी माघार घेतली.
सर्वात जास्त उमेदवार: प्रभाग २६, २८, २९ अंतर्गत सर्वाधिक १२४ वैध उमेदवार रिंगणात आहेत.
सर्वात कमी उमेदवार: प्रभाग १८, १९, २० मध्ये सर्वात कमी म्हणजे ७१ उमेदवार प्रत्यक्ष लढतीत उरले आहेत.
बंडखोरांना शांत करण्यात यश
या आकडेवारीवरून असे स्पष्ट होते की, अनेक प्रभागांमध्ये बंडखोरी शमवण्यासाठी राजकीय पक्षांच्या धुरिणांना यश आले आहे. अर्ध्याहून अधिक उमेदवारांनी (५५४) माघार घेतल्याने आता लढत अधिक स्पष्ट आणि चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.