"अधिकाऱ्यांची गाढवावरून मिरवणूक काढीन" उमेदवारांना धमकावणाऱ्यांवर अंबादास दानवे संतापले; प्रशासनाला दिला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:20 IST2026-01-02T12:17:06+5:302026-01-02T12:20:21+5:30
अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रशासनाचा निषेध केला.

"अधिकाऱ्यांची गाढवावरून मिरवणूक काढीन" उमेदवारांना धमकावणाऱ्यांवर अंबादास दानवे संतापले; प्रशासनाला दिला थेट इशारा
Ambadas Danve: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता धमकावण्याचे राजकारण सुरू झाल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. जिल्ह्यातील एक बडे मंत्री आणि काही प्रशासकीय अधिकारी संगनमत करून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांवर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट करत सत्ताधारी आणि प्रशासनावर टीकेची तोफ डागली आहे.
अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रशासनाचा निषेध केला. "छत्रपती संभाजीनगरमधील एक मंत्री आपल्या पदाचा गैरवापर करून आमच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी धमकावत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे, काही शासकीय अधिकारी देखील या मंत्र्यांचे गुलाम बनले असून, ते स्वतः फोन करून उमेदवारांकडे अर्ज माघारीसाठी पाठपुरावा करत आहेत," असे दानवे यांनी म्हटले आहे. प्रशासकीय यंत्रणेचा राजकीय फायद्यासाठी वापर होत असल्याचा आरोप केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
"छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ताधारी पक्षातील मंत्री शिवसैनिकांना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत असलेल्या उमेदवारांना धमक्या देण्याचा प्रयत्न केला जातोय. काही अधिकारीसुद्धा उमेदवारांना फोन करत आहेत. घोडा मैदान जवळ आहे. एकेकाचा हिशोब ठेवला जाईल. अधिकाऱ्यांना विशेष सांगतोय एखाद्याने फोन केला ना तर त्याची नाय मी गाढवावरुन मिरणवणूक काढली तर माझं नाव अंबादास दानवे नाही. सगळ्या फोनचा रेकॉर्ड ठेवला आहे. म्हणून निवडणूक आयोगाला सांगतोय अशा पद्धतीने मंत्री अधिकाऱ्यांचा गैरवापर करत आहेत. काही उमेदवारांना फोन केले जात आहेत. याची दखल घ्यावी नाहीतर शिवसैनिक धडा शिकवतील," असं अंबादास दानवे म्हणाले.
९९ जागांवर काँटे की टक्कर
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच महानगरपालिका निवडणूक होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने यंदा पहिल्यांदाच स्वबळावर ९९ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दुसरीकडे, शिंदे गटानेही भाजपसोबतची युती तुटल्यानंतर तितक्याच ताकदीने उमेदवार मैदानात उतरवले आहेत. अनेक प्रभागांमध्ये थेट शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार असल्याने, एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
युती तुटल्यावरून भाजप-शिंदे गटात जुंपली
एककीकडे दानवे यांनी शिंदे गटावर आरोप केले असताना, दुसरीकडे माजी युती मित्र असलेल्या भाजप आणि शिंदे गटातही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. संजय शिरसाट यांनी युती तुटण्याला भाजपचे स्थानिक नेते जबाबदार असल्याचा दावा केला होता. त्यावर पलटवार करताना भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी गंभीर आरोप केला आहे. "संजय शिरसाट यांना स्वतःचा मुलगा आणि मुलीला उमेदवारी द्यायची होती, म्हणूनच त्यांनी जाणीवपूर्वक युती तोडली," असे सावे यांनी म्हटले आहे.