छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:33 IST2025-12-31T17:31:41+5:302025-12-31T17:33:29+5:30
या संपूर्ण प्रकारामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यातच पक्षाची मोठी नाचक्की होत असल्याचे चित्र दिसत आहे.

छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
छत्रपती संभाजीनगर: भारतीय जनता पक्षातील उमेदवारीचा वाद आता वैयक्तिक संघर्षापर्यंत पोहोचला आहे. मंगळवारी दुपारपासून सुरू असलेला कार्यकर्त्यांचा उद्रेक बुधवारी सकाळी अधिकच तीव्र झाला. प्रचार कार्यालयात मंत्री अतुल सावे आणि खासदार डॉ. भागवत कराड यांच्या गाड्या अडवत कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. याच गदारोळात प्रशांत भदाणे पाटील या कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. दरम्यान, वाद सोडवण्यासाठी गेलेले पक्षाचे कार्यकर्ते राजू खाजेकरे यांना महिला कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
निष्ठावंतांचा अपमान आणि गोंधळ
प्रचार कार्यालयात सुरू असलेला राडा थांबवण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते राजू खाजेकरे पुढे आले होते. त्यांच्या पत्नी छाया खाजेकर या पक्षाच्या शहर सरचिटणीस आहेत. खाजेकरे यांचा या वादाशी कोणताही थेट संबंध नव्हता, ते केवळ गर्दीत कोणाला इजा होऊ नये म्हणून मध्यस्थी करत होते. मात्र, संतापलेल्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांनाच लक्ष्य केले आणि त्यांच्या कानशिलात लगावली. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या पतीला अशा प्रकारे जाहीर अपमानाला सामोरे जावे लागल्याने भाजपमधील शिस्त धुळीला मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आत्मदहनाचा इशारा अन् उपोषणाचे सत्र
प्रशांत भदाणे पाटील यांनी "बाहेरून आलेल्यांना आणि नेत्यांच्या मर्जीतल्यांना तिकीट दिलं जातंय," असा आरोप करत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला. दुसरीकडे, प्रभाग २० आणि २२ मधील अनेक महिला कार्यकर्त्यांनी कार्यालयातच ठिय्या मांडून उपोषण सुरू केले आहे. "जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उठणार नाही," असा पवित्रा या महिलांनी घेतला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यातच पक्षाची मोठी नाचक्की होत असल्याचे चित्र दिसत आहे.