"दोन्ही ठाकरे एकत्र येणार, आता हे गुपित राहिले नाही!"; अंबादास दानवेंचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 15:43 IST2025-12-23T15:41:47+5:302025-12-23T15:43:19+5:30
स्वतःला मोठा पक्ष म्हणवणारे भाजप आज इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना प्रलोभने देऊन पळवत आहे

"दोन्ही ठाकरे एकत्र येणार, आता हे गुपित राहिले नाही!"; अंबादास दानवेंचे मोठे विधान
छत्रपती संभाजीनगर: "राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येणार, ही बाब आता गुपित राहिलेली नाही. त्यांच्यातील चर्चेची प्रक्रिया पूर्ण झाली असून एक-दोन दिवसांत अधिकृत घोषणा होईल," अशी माहिती शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी दिली. दरम्यान, स्वतःला मोठा पक्ष म्हणवणारे भाजप आज इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना प्रलोभने देऊन पळवत आहे, मात्र तिथे गेल्यावर प्रत्येकाची फसवणूकच होत आहे, अशी जोरदार टीका देखील दानवे यांनी केली.
शिरसाटांना दिलं खुलं आव्हान
ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांचे समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना दानवे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेण्याची ताकद फक्त शिवसेनेत आहे. आम्ही १० तारखेच्या सभेसाठी ६ दिवसांचे मैदान बुक केले आहे. शिरसाटांना जर वाटत असेल की त्यांच्याकडे ताकद आहे, तर मी त्यांना खुली ऑफर देतो की, तुम्ही हे मैदान भरून दाखवा, आम्ही तुम्हाला मैदान द्यायला तयार आहोत," अशा शब्दांत दानवे यांनी शिरसाटांना चॅलेंज दिले.
राजू वैद्य आणि भाजपवर प्रहार
पक्षाचे जुने सहकारी राजू वैद्य यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य करताना दानवे म्हणाले की, "वैद्य हे चांगले कार्यकर्ते होते, पक्षाने त्यांना नेहमीच मान दिला. त्यांनी हा निर्णय का घेतला हे कळले नाही, पण भाजप सध्या फक्त फोडाफोडीचे राजकारण करत आहे. स्वतःला मोठा पक्ष म्हणवणारे भाजप आज इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना प्रलोभने देऊन पळवत आहे, मात्र तिथे गेल्यावर प्रत्येकाची फसवणूकच होत आहे."
प्रचाराचे रणशिंग २६ ला फुंकणार
आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेची (उबाठा) रणनीती स्पष्ट करताना दानवे यांनी सांगितले की, १० जानेवारीला उद्धव ठाकरे यांची विराट सभा होईल. त्यापूर्वी २६ तारखेला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते निवडणूक मोहिमेचा श्रीफळ फोडण्यात येणार आहे. तसेच, महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदे गट वगळता सर्वांनी एकत्र यावे, असा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.