भाजप म्हणजे 'दुतोंडी गांडूळ'! काँग्रेस, एमआयएमसोबतच्या युतीवरून अंबादास दानवेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:20 IST2026-01-07T13:20:09+5:302026-01-07T13:20:55+5:30
अंबरनाथ आणि अकोल्यातील राजकीय समीकरणांवरून दानवेंनी भाजपच्या 'हिंदुत्वा'च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

भाजप म्हणजे 'दुतोंडी गांडूळ'! काँग्रेस, एमआयएमसोबतच्या युतीवरून अंबादास दानवेंचा हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर: "महाविकास आघाडीमध्ये आम्ही काँग्रेससोबत असताना आमच्यावर टीका करणारे भाजपचे लोक आज अंबरनाथमध्ये त्याच काँग्रेससोबत अभद्र युती करत आहेत. भाजपची ही अवस्था म्हणजे 'दुतोंडी गांडूळ' असल्यासारखी आहे," अशा जहाल शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर हल्ला चढवला. अंबरनाथ आणि अकोल्यातील राजकीय समीकरणांवरून दानवेंनी भाजपच्या 'हिंदुत्वा'च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राहुल नार्वेकरांवर पैशांच्या जोरावर दबावाचा आरोप
यावेळी दानवे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. "निवडणूक आयोगावरच नव्हे, तर उमेदवारांवरही दबाव टाकला जात आहे. अपक्ष उमेदवार तेजा पवार यांच्या पतीला नार्वेकरांच्या बंगल्यावर बोलावून रोख रक्कम आणि बीएमसीच्या टेंडरची आमिषे दाखवण्यात आली. विधानसभेच्या अध्यक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी अशा थराला जाणे हे लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे," असे दानवे म्हणाले.
'यूज अँड थ्रो'चे राजकारण
शिंदे गट आणि अजित पवार गटाबाबत बोलताना दानवे म्हणाले की, भाजपसाठी आता हे दोन्ही पक्ष ओझं झाले आहेत. विजय वडेट्टीवार म्हणतात त्याप्रमाणे भाजप हे ओझं लवकरच खाली उतरवेल आणि या दोन्ही नेत्यांना टप्प्याटप्प्याने बाजूला केले जाईल, हे त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.
एमआयएम ही भाजपची 'बी-टीम'च!
अकोल्यात एमआयएमशी झालेल्या थेट युतीवरून दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला. "आमच्यासोबत आलेले मुसलमान यांना 'नापाक' वाटायचे, मग आता एमआयएमसोबत गेलेले 'पाक' झाले का? ओवैसी आणि भाजप हे एकमेकां पूरकच काम करत आहेत," अशी टीका त्यांनी केली. महापालिका आयुक्तांनी बजावलेल्या नोटीसबाबत विचारले असता, "अधिकृत नोटीस आल्यावर मी पुराव्यानिशी उत्तर देईन," असे त्यांनी स्पष्ट केले.