औरंगाबादचा सार्वजनिक गणेशोत्सव शंभरीकडे; १९२४ ला झाला होता स्थापन गणेश महासंघ
By प्रशांत तेलवाडकर | Updated: August 31, 2022 15:42 IST2022-08-31T15:41:48+5:302022-08-31T15:42:21+5:30
औरंगाबादकर यंदा ९८ वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत

औरंगाबादचा सार्वजनिक गणेशोत्सव शंभरीकडे; १९२४ ला झाला होता स्थापन गणेश महासंघ
औरंगाबाद : औरंगाबादकर यंदा ९८ वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. शहरात पहिल्या गणपती मंडळाला स्थापन होऊन १२३ वर्षे पूर्ण झाली असली तरी गणेश महासंघाची स्थापना १९२४ साली झाली. आता येथील सार्वजनिक गणेश महासंघाची वाटचाल शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणजे येथील गणेश महासंघ होय.
लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची प्रेरणा घेऊन औरंगाबादेत १८९९ मध्ये राजाबाजार येथे पहिले सार्वजनिक ‘गणेशभक्त भजन मंडळ’ स्थापन झाले. मंडळांची वाढती संख्या लक्षात घेता १९२४ मध्ये औरंगाबाद गणेश संघ स्थापना करण्यात आला. पहिले अध्यक्ष डॉ. संग्रामसिंह चौहान ठरले. कार्यकारिणीत डॉ. पुरवार, नाथप्रसाद दीक्षित, दादासाहेब गणोरकर, गोविंदभाई श्रॉफ, बाळासाहेब पवार, विनायक पाटील, बद्रीनारायण अग्रवाल, मुरलीधर गोलटगावकर, द्वारकादास पटेल, विजयेंद्र काबरा, बाबूराव काळे, अलफखान, प्रेमचंद मुगदिया, बाबूलाल पराती, जयसिंग महाराज, राजाराम बसैये, आदी मातब्बर असत.
अध्यक्षपदासाठी निवडणूक होई
त्या काळात अध्यक्षपदासाठी ४ ते ५ उमेदवार उभे राहत. १९६६ मध्ये प्रथमच अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. मनमोहन अग्रवाल यांची अध्यक्षपदी निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अरुणभाई कापडिया यांनी काम पाहिले होते. वसंत भवन, बालाजी धर्मशाळा व बन्सीलालनगर येथे प्रत्येकी २ वेळा म्हणजे एकूण ६ वेळा निवडणुका झाल्या. १९६९ या वर्षी छायाचित्रकार नाथप्रसाद दीक्षित अध्यक्ष झाले होते. १९७३ मध्ये सनसिंग ग्रंथी हे अध्यक्ष झाले. त्यानंतर प्रकाश मुगदिया दोनदा अध्यक्ष झाले होते. शिवनाथ राठी, अशोक शहा यांनी अनेक पदांची जबाबदारी सांभाळली होती.
सर्व राजकीय पक्ष समभाव
८० च्या दशकात गणेश महासंघाचे नाव ‘श्री औरंगाबाद गणेश महासंघ’ असे करण्यात आले. या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार आहेत. निवडणुका न घेता अध्यक्षपदाची जबाबदारी दरवर्षी प्रत्येक राजकीय पक्षास दिली जाते. सर्व राजकीय पक्ष समभाव तेव्हापासून जपला जातो.
गणेशोत्सवातून घडले राजकीय नेतृत्व
गणेशोत्सवाने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात नेतृत्व करणारे नेते घडवले. यात किंगमेकर दादासाहेब गणोरकर, गोविंदभाई श्रॉफ, बजरंगलाल शर्मा, अशोक पाटील डोणगावकर, मुरलीभाऊ गवळी, लखन पहिलवान, हरिभाऊ जगताप, शालिग्राम बसैये, संतसिंग ग्रंथी, माणिक गंगवाल, खा. चंद्रकांत खैरे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. किशनचंद तनवाणी, गंगाधर गाडे, रशीद मामू, नंदकुमार घोडेले, रतन घोंगते, किशोर तुलसीबागवाले, आदींचा समावेश होतो.
५० व्या वर्षी स्मरणिका प्रसिद्ध
श्री गणेश संघाला ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा १९७३-१९७४ या वर्षी स्मरणिका प्रकाशित केली होती.