पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज बाद; अपक्षांना पुरस्कृत करण्याची राजकीय पक्षांवर नामुष्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 19:18 IST2026-01-01T18:41:13+5:302026-01-01T19:18:39+5:30
महापालिका निवडणुकीत यापूर्वी उमेदवारी अर्ज फक्त चार पानांचा होता. आता अर्जासोबत किमान २० ते २२ विविध शपथपत्र आणि कागदपत्रे जोडायची होती.

पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज बाद; अपक्षांना पुरस्कृत करण्याची राजकीय पक्षांवर नामुष्की
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीअंतर्गत बुधवारी शहरातील सर्व नऊ निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात राजकीय पक्षांच्या काही उमेदवारांचे अर्ज त्रुटीमुळे बाद ठरविण्यात आले. त्यामुळे राजकीय पक्षांवर नवीन संकट ओढवले. ज्या ठिकाणी उमेदवार नाही, त्या प्रभागातील अपक्षांना पुरस्कृत म्हणून पाठिंबा देण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे.
महापालिका निवडणुकीत यापूर्वी उमेदवारी अर्ज फक्त चार पानांचा होता. आता अर्जासोबत किमान २० ते २२ विविध शपथपत्र आणि कागदपत्रे जोडायची होती. अतिशय किचकट पद्धतीचा अर्ज होता. त्यामुळे अनेक उमेदवारांची अर्ज भरताना दमछाक झाली. काही उमेदवारांनी अर्ज भरताना काळजी घेतली नाही. चुकीच्या आणि स्वयंघोषित तज्ज्ञ मंडळींकडून अर्ज भरून घेतले. त्याचे परिणाम बुधवारी उमेदवारी अर्जांच्या छाननीत दिसून आले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अत्यंत छोट्या-छोट्या गोष्टींवरून अर्ज बाद केले. त्यामुळे उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. अर्ज बाद होणाऱ्या उमेदवारांमध्ये अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार आहेत. ज्यांचे अर्ज बाद झाले तेथे कोणी सक्षम अपक्ष आहे का? याची चाचपणी राजकीय पक्षांनी बुधवारी दुपारीच सुरू केली. अपक्षांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा देण्याची तयारी दर्शविण्यात आली. ज्या ठिकाणी राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले तेथील अपक्षांना चांगले दिवस आले आहेत. अपक्षाला निवडणूक लढताना पाठिंबा दिलेल्या संबंधित पक्षाचे चिन्ह वापरता येणार नाही.
डमी उमेदवार हा प्रकारच नाही
उमेदवारी घोषित करण्यात सर्वच राजकीय पक्षांनी घोळ घातला. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बी-फाॅर्म, उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने डमी उमेदवार म्हणून अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे जेथे अधिकृत उमेदवारांचे अर्ज बाद झाले तेथे अपक्षांना जवळ करण्याची वेळ आली आहे.