राजकीय नेत्यांचा असाही डाव, एकाच प्रभागात दोन जणांना बी-फाॅर्म, कोणाचा ठरला वैध?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:49 IST2026-01-01T13:47:46+5:302026-01-01T13:49:17+5:30
या निवडणुकीत सी-फाॅर्म हा प्रकारच नसतो, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.

राजकीय नेत्यांचा असाही डाव, एकाच प्रभागात दोन जणांना बी-फाॅर्म, कोणाचा ठरला वैध?
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांनी मंगळवारी सकाळपासूनच बी-फाॅर्म वाटप करण्याचा सपाटा लावला. एका प्रभागातील एकाच प्रवर्गातील दोन वेगवेगळ्या उमेदवारांना बी-फाॅर्म देण्याची किमया काही पक्षांनी केली. उमेदवारी अर्जाच्या छाननीत हा घोळ समोर आला. दोन बी-फाॅर्ममुळे दोन्ही उमेदवार संकटात आले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ज्याचा फाॅर्म अगोदर आला, त्याला पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून गृहीत धरले जाईल, असा नियम असल्याचे सांगितले. त्यामुळे दुसऱ्या उमेदवाराला बी-फाॅर्म मिळूनही अपक्ष उमेदवार व्हावे लागले. या निवडणुकीत सी-फाॅर्म हा प्रकारच नसतो, असेही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिंदेसेनेकडून शहरात अनेक प्रभागांत एकाच प्रवर्गातील दोन उमेदवारांना बी-फाॅर्म दिल्याचे उघडकीस आले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोणत्या उमेदवाराचा अर्ज किती वाजता आला, याची तपासणी केली. अगोदर आलेल्या उमेदवाराला प्राधान्य देत त्यांना अधिकृत उमेदवार असल्याचा निर्वाळा दिला.
झोन क्रमांक १ येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात एका उमेदवाराला अपक्ष ठरविण्यात आले. त्याने पक्षाच्या वरिष्ठांना फोन लावून सर्व हकीकत सांगितली. त्वरित सी-फाॅर्म पाठवा, असेही त्यांनी सांगितले. नेत्यांनीही होकार दिला. उमेदवार आणि त्यांचे समर्थक सायंकाळपर्यंत सी-फाॅर्मची वाट पाहत थांबले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, या निवडणुकीत सी-फाॅर्मची तरतूदच नसते. प्रपत्र-१ आणि प्रपत्र -२ असे विवरण असते. १ मध्ये पक्षाने प्राधिकृत केलेल्या नेत्याच्या नावाने सहीसह पत्र दिले जाते. २ मध्ये प्रभाग क्रमांक, उमेदवाराचे नाव असलेले संबंधित नेत्याच्या सहीचे पत्र असते. त्यालाच बी-फाॅर्म म्हणतात.