"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 18:38 IST2025-12-31T18:37:42+5:302025-12-31T18:38:37+5:30
उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांचे वाद सुरू झाले आहेत.

"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
छत्रपती संभाजीनगरमध्ये एकीकडे भाजपात काही इच्छुकांच्या नाराजीचा मुद्दा गाजत असताना उद्धवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये पुन्हा वाद शिलगला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी विजयी होऊ शकणाऱ्या महिलांची तिकीटे कापल्याचा आरोप केला आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक यावेळी प्रचंड चर्चेची ठरू लागली आहे. गेल्या दोन दिवसात घडलेल्या घटनांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपानंतर आता उद्धवसेनेमध्येही वाद उफाळताना दिसत आहे. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील मतभेद ऐन निवडणुकीच्या तोंडावरच समोर आले आहेत.
उद्धवसेनेच्या काही महिलांना इच्छुकांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे या महिलांना रडू कोसळले. यावरून चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपाला सोपे जावे म्हणून अंबादास दानवे यांनी निवडून येऊ शकणाऱ्या महिलांची तिकिटे कापली, असा गंभीर आरोप खैरेंनी दानवेंवर केला आहे.
खैरेंचा विरोध डावलून मामूंना उमेदवारी
काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून उद्धवसेनेत आलेले माजी महापौर रशीद मामू यांना चंद्रकांत खैरे यांनी विरोध केला. माझा या प्रवेशाला विरोध आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबद्दल अनिश्चितता होती. पण, अंबादास दानवेंनी खैरेंचा विरोध डावलून मामूंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे खैरेंना डिवचले असल्याचीच चर्चा रंगली आहे.