आता पॅनल नावालाच; विरोधी पक्षांची ट्यूनिंग करून काही प्रभागांत उमेदवारांचे एकला चलो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:55 IST2026-01-08T13:52:30+5:302026-01-08T13:55:01+5:30
काही प्रभागांत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारासोबत ट्युनिंग सेट करीत आपली सीट काढून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

आता पॅनल नावालाच; विरोधी पक्षांची ट्यूनिंग करून काही प्रभागांत उमेदवारांचे एकला चलो
- मुजीब देवणीकर
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात मागील दोन दिवसांपासून प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे. प्रभाग पद्धतीच्या या निवडणुकीत एकाच पक्षाच्या चार, तर काही ठिकाणी तीन उमेदवारांच्या पॅनलचा आपसांत ताळमेळ जुळणे अवघड जाते आहे. त्यामुळे प्रभागातील सक्षम उमेदवाराने आता ‘एकला चलो रे’ची भूमिका स्वीकारली आहे. कमकुवत उमेदवारामुळे आपण पराभवाच्या खाईत का पडावे? या भावनेतून काही उमेदवारांनी वैयक्तिक प्रचारावर अधिक भर दिला आहे. काही प्रभागांत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारासोबत ट्युनिंग सेट करीत आपली सीट काढून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
प्रचारासाठी उमेदवारांकडे आता फक्त ७ दिवसांतील मोजून १६८ तास प्रचारासाठी शिल्लक आहेत. निवडणूक रिंगणात ८५९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यात राजकीय पक्षाच्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. सर्वच राजकीय पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढवत आहेत. सुरुवातीला राजकीय पक्षाच्या पॅनलमधील सर्व उमेदवार एकदिलाने प्रचाराला बाहेर पडत होते. काही उमेदवारांना मतदारांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पॅनलमधील काही प्रमुख उमेदवारांनी आपल्या अन्य उमेदवारांना सोडून प्रचार सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
प्रचार, प्रसार एकट्याचा
प्रभागातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार उपलब्ध विविध साधनांचा वापर करीत आहेत. यामध्ये पक्षाच्या चारही उमेदवारांनी एकत्रित मतदारांपर्यंत पोहोचणे पक्षाला अपेक्षित आहे. अनेक ठिकाणी असे होताना दिसून येत नाही. आर्थिक बाबीवरून ताणाताणीचे प्रसंग उद्भवत आहेत, अशी चर्चाही कानी येते. अंतर्गत वाद, पैशांची चणचण आदी अनेक कारणांमुळे काहींनी पक्षातील अन्य उमेदवारांची साथ जवळपास सोडली आहे. राजकीय पक्षांप्रमाणे उमेदवारही प्रभागात स्वबळावर पुढे जात आहेत.
विरोधी पक्षासोबत सेटिंग
एकाच प्रभागात दोन वेगवेगळ्या पक्षांकडून सक्षम उमेदवार आहेत. मात्र, ते दुसऱ्या प्रवर्गात असल्याने त्यांनी आपसात सेटिंग करून घेतल्याची चर्चाही जोर धरायला लागली आहे. ‘तुम्ही आम्हाला- आम्ही तुम्हाला’ मदत करू असे धोरण स्विकारल्याची चर्चा आहे. निवडणूक निकालानंतरच या बाबी समोर येतील.