छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 19:19 IST2025-12-31T19:18:18+5:302025-12-31T19:19:35+5:30
"आम्ही राबलो, आम्ही झटलो, पण पदरी पडली फक्त हेटाळणी!" पालकमंत्री शिरसाटांच्या बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांचा रडकुंडीला येऊन ठिय्या.

छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
छत्रपती संभाजीनगर: शहरातील राजकीय वातावरण आता अत्यंत तापले असून भाजपपाठोपाठ शिंदेसेनेतही (शिवसेना) बंडाळीचा मोठा स्फोट झाला आहे. प्रभाग २० मधील तिकीट नाकारल्याने संतप्त झालेले निष्ठावान कार्यकर्ते सुनील सोनवणे यांनी आपल्या समर्थकांसह थेट पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निवासस्थान गाठले. "आम्ही रात्रंदिवस पक्षासाठी झटलो, पण ऐनवेळी पक्षात आलेल्यांनी आमचे तिकीट कापले," असा खळबळजनक आरोप करत सोनवणे यांनी घरासमोरच ठिय्या मांडला.
'गद्दार' म्हणणाऱ्यांच्या शब्दावर तिकीट कापले
सुनील सोनवणे यांनी प्रभाग प्रभारी त्र्यंबक तुपे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "जे कालपर्यंत आम्हाला गद्दार म्हणत होते, ते आज पक्षात येऊन प्रभारी झाले आणि त्यांनीच आमचे तिकीट कापले. हा निष्ठेचा अपमान आहे, शिरसाट यांनी तुपे यांचे ऐकून आमची उमेदवारी कापली" अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जीवाचे रान करून पक्षाला आघाडी मिळवून दिली, तरीही महापालिका निवडणुकीत डावलले गेल्याची सल कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
पालकमंत्र्यांकडे मागितला जाब
सुनील सोनवणे यांना बोलताना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, "प्रभाग २० मध्ये असा उमेदवार दिला की त्याची बायको भाजपचे काम करते, ही सगळी मॅच फिक्सिंग आहे. आता पालकमंत्री शिरसाट यांनीच सांगावे आम्ही काय करायचे? त्यांनी पक्ष सोडायला सांगितले तर आम्ही सोडू, त्यांनी जीव द्यायला सांगितला तर आम्ही तोही देऊ. पण आमच्या निष्ठेची ही अशी किंमत का?" शिरसाटांच्या घराबाहेरील या भावनिक आक्रोषामुळे शिंदेसेनेच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आधीच मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या असताना, आता शिंदेसेनेतील नाराजगी देखील बाहेर पडत आहेत. स्वतःच्याच पक्षातील कार्यकर्त्यांना शांत करण्याचे मोठे आव्हान संजय शिरसाट यांच्यासमोर उभे ठाकले आहे.