७९२ चे २८०० कोटी झाले, पण छत्रपती संभाजीनगराला पाणी मिळेना: मंत्री आदिती तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:02 IST2026-01-13T15:02:07+5:302026-01-13T15:02:39+5:30
मूलभूत समस्या सोडविण्यासाठी घड्याळाला मतदान करा, मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

७९२ चे २८०० कोटी झाले, पण छत्रपती संभाजीनगराला पाणी मिळेना: मंत्री आदिती तटकरे
छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांचे मूलभूत प्रश्नही सुटलेले नाहीत. आठ-आठ दिवस पाणी येत नाही. ७९२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना २८०० कोटींवर पोहोचली तरीही पाणी मिळालेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी १५ जानेवारीला राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या प्राचारार्थ मंत्री आदिती तटकरे, आ. अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष आ. सतीश चव्हाण, शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी परिवर्तन सभा घेण्यात आल्या. त्यात प्रभाग क्रमांक २६ मधील रेणुका माता मंदिराजवळ, २१ मधील विष्णूनगर ते उत्तमनगर यादरम्यान रॅली, २३ मधील विश्रांतीनगर ते जयभवानीनगर दरम्यान रॅली, २४ मधील मुकुंदवाडी आणि १६ क्रमाकांच्या प्रभागात कैलासनगरमध्ये परिवर्तन सभा घेण्यात आल्या. यावेळी मंत्री तटकरे म्हणाल्या, माता-भगिनी सक्षम होण्यासाठी, त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी पक्षानेच पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे शहरातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी येणाऱ्या १५ तारखेला घड्याळ निशाणी समोरील बटन दाबून पक्षाच्या उमेदवारांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
सत्ता उपभोगली पण...
आ. अमोल मिटकरी म्हणाले, छत्रपती संभाजीनगर पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखली जाते. या पर्यटनाच्या राजधानीत महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्यांना रस्ते, पाणी, कचरा, ड्रेनेज अशा मूलभूत सुविधादेखील नागरिकांना देता आल्या नाही हे खेदजनक आहे. आमच्या पक्षाने पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई येथे सत्ता असताना जो विकास केला तोच विकास आम्ही छत्रपती संभाजीनगरात करू, असेही त्यांनी सांगितले.