मतदान ते मतमोजणी छत्रपती संभाजीनगरात ५ हजार पोलिसांचा ४८ तास कडेकोट बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 13:54 IST2026-01-14T13:54:19+5:302026-01-14T13:54:41+5:30
एसआरपीएफचे २५० शस्त्रधारी जवानांचे पथक दाखल : सलग ४८ तास शहर पोलिस राहणार कार्यरत

मतदान ते मतमोजणी छत्रपती संभाजीनगरात ५ हजार पोलिसांचा ४८ तास कडेकोट बंदोबस्त
छत्रपती संभाजीनगर : गुरुवार व शुक्रवारी पार पडत असलेल्या मतदान व मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली असून, तब्बल ४ हजार ६६७ पोलिस अधिकारी, अंमलदारांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, गुरुवारपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ४८ तासांपेक्षा अधिक काळ शहर पोलिस सुरक्षेसाठी तैनात असतील.
महानगरपालिकेच्या निवडणुका निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मंगळवारी सर्व वरिष्ठ अधिकारी, ठाणे प्रभारींना आवश्यक सूचना केल्या. पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, प्रशांत स्वामी, शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, रत्नाकर नवले यांच्या नेतृत्वाखाली पाच दिवस झालेल्या बैठकांमध्ये दोन दिवसांच्या बंदोबस्ताचे नियोजन आखण्यात आले. प्रत्यक्षातल्या बंदोबस्तासह संवेदनशील ठिकाणी दहापेक्षा अधिक ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी सायबर पोलिसांच्या विशेष प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचे उपायुक्त (गुन्हे शाखा) रत्नाकर नवले यांनी सांगितले.
२८३ जण ४८ तासांसाठी हद्दपार राहणार
-अनुचित प्रकार टाळण्यासाठी मागील काही निवडणुकीदरम्यान गुन्हा केलेल्या २८३ जणांना मतदान व मतमोजणी प्रक्रियेदरम्यानच्या ४८ तासांसाठी हद्दपार करण्यात येईल. सकाळी ७ ते १० या वेळेत त्यांचे मतदान करून त्यांच्यावर ही कारवाई होईल.
-निवडणुकीदरम्यान ९०५ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया.
-संपूर्ण निवडणूक कालावधीसाठी २८ जण हद्दपार.
-४ कुख्यात गुन्हेगार एमपीडीएअंतर्गत राज्यातील अन्य कारागृहांत स्थानबद्ध.
-८४७ परवानाधारकांचे शस्त्र जमा करण्यात आले.
असा असेल बंदोबस्त
-गुरुवार, शुक्रवारी ४ हजार ६६७ पोलिसांचा बंदाेबस्त राहील.
-१९२८ होमगार्ड पोलिसांच्या मदतीला तैनात.
-एसआरपीएफची १ कंपनी व २ प्लाटूनचे शस्त्रधारी जवान संवेदनशील परिसरात तैनात.
वाहने, टॅब, मोबाइलला प्रतिबंध
-चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील गरवारे हायटेक फिल्म, उस्मानपुऱ्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये १६ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडेल. यासह सर्व मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल, टॅबलेटचा वापर, देवाणघेवाण करता येणार नाही.
-सदर ठिकाणी आगपेटी, लायटर, तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जाण्यास मनाई.
-निवडणुकीसंबंधी अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व निवडणूक कार्यालयाने नियुक्त कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतरांना प्रवेश निषिद्ध.
-केवळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या वाहनांनाच परिसरात प्रवेश असेल, असे आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी जारी केले.
निर्भयपणे मतदान करा, अफवांवर विश्वास ठेवू नका
मनपा निवडणूक सुरळीत, निर्विघ्न पार पाडण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाळा. कुठेही अनुचित प्रकार असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.
- प्रवीण पवार, पोलिस आयुक्त