सिंदेवाहीत कृषी विद्यापीठ केव्हा होणार स्थापन ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 14:59 IST2025-03-25T14:58:13+5:302025-03-25T14:59:05+5:30
पूर्व विदर्भाची उपेक्षा : सिंदेवाहीत नव्या कृषी विद्यापीठाचा होता प्रस्ताव

When will Sindewahi Agricultural University be established?
संदीप बांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : विदर्भातील एकमेव अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाजन करून पूर्व विदर्भात स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मध्यंतरी मोठ्या हालचाली सुरू होत्या. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे कृषी संशोधन केंद्र, विज्ञान केंद्र असल्यामुळे येथे नवे कृषी विद्यापीठ स्थापन केले जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यादृष्टीने प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे. तसेच तालुका विकास संघर्ष समिती, व्यापारी असोसिएशनकडून निवेदनाद्वारे यासाठी प्रयत्नही झाले. मात्र, सदर प्रस्ताव आता थंडबस्त्यात पडला आहे. याबाबत कोणत्याही हालचाली केल्या नसल्याने पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांचे उपेक्षा होत आहे.
विदर्भात अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संपूर्ण विदर्भात एकमेव कृषी विद्यापीठ आहे. या भागात धान हे प्रमुख पीक असल्याने त्यावरील संशोधन कार्य अनेकदा उपेक्षित राहते, यांची खंत या भागातील कृषीतज्ज्ञ, राजकीय नेते, शेतकरी यांना कायम राहिली आहे. त्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाजन करून सिंदेवाहीत कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी पूर्व विदर्भातील १२ जिल्ह्यांना यामुळे कृषी संशोधन कामासाठी न्याय मिळेल, अशीही भूमिका विद्यापीठ स्थापनेच्या समर्थनार्थ मांडण्यात आली होती.
सरकारच्या दालनात अडकले कृषी विद्यापीठ
सिंदेवाहीत कृषी विद्यापीठ झालेच पाहिजे, यासाठी तालुका संघर्ष समिती, व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून नेहमीच जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री महोदयांना निवेदनासह पत्रव्यवहार करण्यात आले होते. परंतु अजूनही सरकारच्या दालनातच हे कृषी विद्यापीठ अडकून आहे.
माशी कुठे शिंकली ?
विद्यापीठांतर्गत सिंदेवाही कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र आहेत. हे लक्षात घेऊन सिंदेवाही कृषी विद्यापीठ निर्मितीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. यादृष्टीने प्रस्ताव सादर केल्याची चर्चाही आहे. मात्र, त्यानंतर माशी कुठे शिंकली, माहीत नाही.
वडेट्टीवार सिंदेवाही तर मुनगंटीवार मूलसाठी होते आग्रही
दिवंगत आर आर. पाटील गडचिरोलीचे पालकमंत्री असताना निधी उपलब्ध करून गडचिरोली येथे कृषी महाविद्यालयाची इमारत उभी केली. त्यामुळे या भागात अनेक खासगी कृषी महाविद्यालये दुर्गम परिसरात निर्माण झाली. या भागात रोजगार निर्मितीचे शेती हे मोठे साधन होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शेतीसाठी कुशल मनुष्यबळ, नवे तंत्रज्ञान निर्माण करणे या दोन्ही बाबी लक्षात घेऊन नवीन विद्यापीठ स्थापन करण्यात येणार होते. या क्षेत्राचा विकास होईल, या दृष्टीने माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाठिंबा दर्शविला होता. सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ स्थापन होईल, अशी त्यांची आग्रही भूमिका होती. तर आमदार सुधीर मुनगंटीवार मूल येथे विद्यापीठ स्थापन व्हावे, यासाठी आग्रही होते.