चंद्रपूरसह यवतमाळात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
By परिमल डोहणे | Updated: August 25, 2023 18:03 IST2023-08-25T17:59:26+5:302023-08-25T18:03:20+5:30
गोंडपिपपरी, भद्रावती, वणी हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली

चंद्रपूरसह यवतमाळात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
चंद्रपूर : जिल्ह्याभरात कुलूपबंद घरे फोडणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांनी गोंडपिपरी, भद्रावती, वणी जि. यवतमाळ हद्दीत घरफोडी केल्याचे कबूल केले आहे. सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे (२६, रा. सोमनाथपुरा, राजुरा), मोईन उर्फ फैजान शरीफ शेख (१८, रा. गडचिरोली) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला निर्देश दिले होते. दरम्यान २३ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करताना बल्लारपूर येथे सोने-चांदीचे दागिने, एलईडी टीव्ही विकण्याकरिता ग्राहक शोधत असताना पोलिसांनी या दोन सराईत गुन्हेगारांना पकडले. अधिक विचारपूस केली असता, त्यांनी गोंडपिपपरी, भद्रावती, वणी हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सपोनी नागेश कुमार चातारकर, नितीन साळवे, प्रकाश बल्की, सुभाष गोहोकार, मुजावर अली, मिलिंद जांभूळे, सतीश बगमारे, नरेश डाहुले, ऋषभ बारसिंगे आदींनी केली.