तृतीयपंथी मतदार कोणत्या रांगेत उभे राहून करणार मतदान? सहा मतदारसंघांत ४८ तृतीयपंथी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 11:50 IST2024-11-16T11:48:49+5:302024-11-16T11:50:01+5:30
Chandrapur : ब्रह्मपुरी व चिमुरात शून्य, तर चंद्रपूर विधानसभेत ३५ तृतीयपंथी

Transgender Voters will vote by standing in which line? 48 third parties in six constituencies
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : संविधानात प्रत्येकालाच मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे मतदार यादीमध्ये पुरुष, स्त्री व इतर म्हणून तृतीयपंथीयांची नोंद केली जाते. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयार झालेल्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात ४८ तृतीयपंथीयांची नोंद आहे. परंतु, प्रत्यक्षात मतदान केंद्रावर केवळ स्त्री व पुरुष अशीच स्वतंत्र मतदारांची रांग असते. त्यामुळे तृतीयपंथीयांनी कोणत्या रांगेत उभे राहायचे, असा प्रश्न तृतीयपंथीयांना प्रत्येकच निवडणुकीच्या वेळेस भेडसावत असतो.
२१ व्या शतकातही तृतीयपंथीयांची हेळसांड केली जाते. त्यामुळे ते समाजाकडून व शासनाकडून उपेक्षित आहेत. परिणामी अनेक तृतीयपंथी आपली ओळख लपवत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये सहाही मतदारसंघांचा विचार केल्यास ४८ तृतीयपंथी असल्याची नोंद आहे. अनेक जणांनी नोंदणी केली नाही, तर नोंदणी केलेले अनेक तृतीयपंथी मतदार मतदानाकडे पाठ फिरवत असल्याचे आजपर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
सर्वाधिक तृतीयपंथी मतदार या मतदारसंघात
चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, राजुरा, वरोरा, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर या सहा विधानभा क्षेत्रांचा समावेश होतो. यात एकूण ४८ तृतीयपंथीयांची नोंदणी आहे. त्यापैकी सर्वाधिक तृतीयपंथी हे चंद्रपूर विधानसभेत आहेत. चंद्रपूर विधानसभेत ३५ तृतीयपंथी मतदार आहेत.
नावनोंदणीत 'इतर' असा पर्याय; रांगा दोनच का
- तृतीयपंथीयांच्या मागणीनुसार न्यायालयानेही त्यांची मतदार म्हणून स्वतंत्र नोंद घेतली.
- त्यामुळे मतदार नोंदणीतही इतर असा स्वतंत्र पर्याय ठेवला, तरीही अनेकांची नोंदणी झालेली नाही.
- लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पुरुष आणि स्त्री मतदार अशा दोनच रांगा होत्या. परंतु, यंदा ज्येष्ठ, दिव्यांग आणि तृतीयपंथीयांना थेट मतदान केंद्रात प्रवेशाचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे.
तृतीयपंथी नाव नोंदणीत उदासीन का?
२१ व्या शतकात तृतीयपंथी स्वतःची ओळख लपवत आहेत. त्यामुळे अनेक तृतीयपंथी नाव नोंदणीसाठी उदासीन दिसून येतात.
लोकसभेत फक्त ५ जणांनीच केले मतदान
चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातसुद्धा ४८ तृतीयपंथीयांची नोंद होती. त्यापैकी केवळ पाच तृतीयपंथीयांनी मतदान केले असल्याची माहिती आहे.
सहा मतदार संघांत ४८ तृतीयपंथी मतदार
मतदारसंघ संख्या
राजुरा ०२
चंद्रपूर ३५
बल्लारपूर ०७
ब्रह्मपुरी ००
चिमूर ००
वरोरा ०४
एकूण ४८