गारपिटीसह वादळी पावसाने १३ गावांना झोडपले; पोंभूर्याला दुसऱ्यांदा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:32 IST2025-04-29T15:32:23+5:302025-04-29T15:32:53+5:30
पाटण परिसरात सर्वाधिक नुकसान : वीज खांब कोसळले, अनेकांचे टिन पत्रे उडाली, गावे अंधारात

Thunderstorms with hailstorm hit 13 villages; Pombhurya hit for the second time
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभूर्णा/पाटण : आधीच्या नुकसानीतून सावरण्याआधीच गारपीटसह अवकाळी वादळी पावसाने सोमवारी (दि. २८) पोंभूर्णा तालुक्यातील दहा गावे आणि जिवती तालुक्यातील तीन अशा एकूण १३ गावांना झोडपले. वादळामुळे वीज खांब कोसळले, घरावरील टिन पत्रे उडाली. पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. वीज खंड झाल्याने रात्रभर अंधाराचा सामना करावा लागला.
दिवसभर कडक उन्ह निघाले. मात्र, सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले. दरम्यान, सोसाट्याचा वारा वाहू लागला. दरम्यान, गारांसह पावसाने झोडपल्याने मोठी तारांबळ उडाली. तालुक्यातील पोंभूर्णा, देवाडा खुर्द, जामतुकूम, जाम खुर्द, थेरगाव, वेळवा, चेक बल्लारपूर, आष्टा, सोनापूर, चिंतलधाबा या गावांना सर्वाधिक बसला. या भागातील शेतकऱ्यांनी मका लागवड केली. पिकाची स्थिती सध्या उत्तम असताना गारपिटीच्या तडाख्यात सापडल्याने नुकसान झाले आहे. घरांवरील टिन पत्रे उडाली. चेक पोंभूर्णा येथील एका घराचा वीज मीटर उखळला आहे.
या परिसरात पडला पाऊस
दिवसभर उन्हाचा तडाखा बसल्यानंतर सायंकाळी अचानक पाऊस बरसला. त्यामुळे नागरिकांना मिळेल तिथे आडोसा घ्यावा लागला. धाबा व राजोली परिसरात विजांचा कडकडाट पाऊस पडला. ब्रह्मपुरीतही काही ठिकाणी तुरळक गारा पडल्या. तोहोगावात काहींची टिन पत्रे उडाली. पिंपळगाव भो., घोसरी व नांदगाव परिसरात पाऊस बरसला. गेवरा परिसरात गारपीट झाल्याची माहिती नागरिकांनी दिली.
छप्पर उडाल्याने धान्य भिजले
विरूर स्टेशन : विरूर परिसरात दुपारी ४:३० वाजता गारपीट झाल्याने अनेक घरांचे छप्पर उडाले. अन्नधान्य भिजून वाया गेले. झाडे उन्मळून पडली, खांबावर मोठे वृक्ष कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. विरूर येथील शांताराम नारनवरे, अशोका रेस्टॉरंट अॅण्ड बार, जगतसिंग वधावन, केळझर येथील दयाराम रामटेके, नारायण नारनवरे, मारोती कोडापे यांच्या घरांचे नुकसान झाले.
४६ घरांचे नुकसान
जिवती तालुक्यातील पोचुगूडा येथील १६, टाटाकवड्यात १४ व गोंविदपुरातील १६ घरांना वादळा तडाखा बसला. वादळी पावसाने अनेकांचे संसार उघड्यावर आले. गोविंदपूर येथील मारुती बुरडकर, श्रीराम सूर्यवंशी, बंडू ठमके, संभाजी बुरेवाड, चंद्रकांत जाधव, माधव तुळशीराम, लक्ष्मण पिल्लेवाड, भीमराव मामीलवाड, मारुती मामीलवाड, विशाल रागेवाड, उत्तम पोले, बलवंत, सुशीलाबाई, प्रतिभा पोले, अरुण धुळगुंडे यांच्या घरांचे नुकसान झाले. टाटाकवडा येथील दीपक मलिलवार, शेषेराव पवार, भावराज मेकिले, कैलास वाढ, कुंदन मडावी, संदीप गुणशेट्टी, मारुती तारशेटे, सूर्यवंश कवडे, मारुती कवडे, चंद्रभागा मंडले, व्यंकटी गजीले, गोविंद कासले, तिरुपती यांच्याही घरांना पटका बसला. पोचुगुडा येथील काशीनाथ सूर्यवंशी, भाऊराव फुरसुंगी, नानाजी गेडाम, सिंधू कुरसंगे, माधव दूरशेट्टी, सुरेश आत्राम, पुष्पा कुळसंगे, रवींद्र आत्राम, पुरुषोत्तम आत्राम, लीला कुमरे, भीमराव आत्राम, विजय आत्राम, हनुमंतुमल्ला आत्राम, भीमराव मडावी, चंद्रभान फुरसुंगी यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. प्रशासनाने पाहणी करून मदत द्यावी, अशी मागणी आहे