Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 16:28 IST2025-05-11T16:22:49+5:302025-05-11T16:28:30+5:30
Tiger Attack Three Womens in Chandrapur: चंद्रपुरात वाघाने एकाच वेळी चार महिलांवर हल्ला केला. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक महिला गंभीर जखमी झाली.

Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
चंद्रपुरात शनिवारी दुपारी वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाला. तर, एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना सिंदेवाही वनपरिक्षेत्राजवळील मेंढमाळ गावातील जंगलात घडली. मृत महिला तेंदूची पाने गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघने एकाच वेळी तीन जणांना ठार केल्याची आणि एकाला जखमी केल्याची ही पहिलीच घटना आहे, अशी माहिती वन्यजीव अधिकाऱ्याने दिली. या हल्ल्यानंतर गावात दहशत निर्माण झाली असून वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे.
कांताबाई चौधरी (वय, ५५), त्यांची सून शुभांगी चौधरी (वय, ३०) आणि सारिका शेंडे (वय, ५०) अशी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. सिंदेवाहीपासून ८ किमी अंतरावर असलेल्या डोणगाव बीटच्या कंपार्टमेंट क्रमांक १३५५ मध्ये या महिलांचे मृतदेह आढळले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आणि जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. या घटनेची तपासणी करण्यासाठी वन विभाग परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहत आहे. तसेच नागरिकांना जंगल परिसरात जाऊ नये, असेही आवाहन करण्यात आले. वन विभागाने मृतांच्या कुटुंबियांना २५,००० रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली आहे.
विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
या घटनेवर स्थानिक आमदार आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या महिलांच्या मृत्युची जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल. आम्ही वारंवार या वाघांना दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याची मागणी केली. परंतु, अधिकाऱ्यांनी आमची विनंती गांभीर्याने घेतली नाही', असा आरोप त्यानी केला.
वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत १६ जण ठार
महाराष्ट्रात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २२५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.यातील बहुतेक मृत्यू वाघांच्या हल्ल्यांमुळे झाले. चंद्रपुरात यावर्षी वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत १६ जणांचा मृत्युची नोंद करण्यात आली. गेल्या वर्षी वाघाच्या हल्ल्यात एकूण २७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. २०२३ मध्ये ही संख्या २५ वर होती. २०२२ मध्ये वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक ५१ मृत्युची नोंद झाली. तज्ज्ञांचे मते, वन्यजीवांसाठी राहण्याची जागा कमी होत असल्याने अशा घटना वाढत आहेत.