गांजा विक्रीसाठी ग्राहक शोधताना तिघांना बेड्या; पाच किलो गांजासह साडे १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
By परिमल डोहणे | Updated: September 2, 2023 17:33 IST2023-09-02T17:05:52+5:302023-09-02T17:33:26+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गांजा विक्रीसाठी ग्राहक शोधताना तिघांना बेड्या; पाच किलो गांजासह साडे १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर : चारचाकी वाहनातून गांजाची तस्करी करणाऱ्या तिघास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर बायपास रोडवर शनिवारी अटक करून पाच किलो २१३ ग्रॉम गांजासह १६ लाख ४९ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यश राज दुर्योधन (१८), नेहाल इकरार ठाकूर (२१) दोघेही रा. गडचिरोली, सगीर खान ननुआ खान (३२) हल्ली मुक्काम गडचिरोली मूळ राहणार निकोनी शाहायपूर, उत्तर प्रदेश अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
एमएच ३३ एसी ११०१ क्रमांकांच्या स्कॉर्पिओतून बल्लारपूर बायपास रोडवर अमली पदार्थाच्या विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक अतुल कावळे व त्याच्या चमूने बायपास रोड गाठून त्या गाडीचा शोध घेतला. यावेळी बजाज विद्या निकेतन शाळेच्या बाजूला ते संशयित वाहन दिसून आले. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, पोलिसांनी पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता एका निळ्या प्लास्टिक पिशवीमध्ये ५२ हजार १३० रुपये किमतीचा पाच किलो २१३ ग्रॅम गांजा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्या तिघांनाही अटक करुन गांजासह १६ लाख ४९ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस रामनगर पोलिस ठाण्यात कलम ८ (क), २० (ब) (२) (४), ४१, ४३ एनडीपीएस ३४ भादंवी गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस.) १९८५ अन्वये गुन्हा नोंद करुन अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक अतुल कावळे, पोह शकील शेख, नापोकों अनुप डांगे, मिलिंद चव्हाण, नितेश महात्मेल, जमीन पठाण, प्रमोद कोटनाके, प्रसाद धुळगंडे, रूपभ बारसिंगे आदींनी केली.