'त्यांनी' थाटात लावले चक्क बाहुला-बाहुलीचे लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 17:09 IST2024-05-10T17:08:38+5:302024-05-10T17:09:41+5:30
जुन्या आठवणींना उजाळा : बालकांसह पालकांनी घेतला सहभाग

'They' staged a doll wedding
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मोबाइल, इंटरनेटच्या जगात गुरफटलेल्या आजच्या मुलांना आपली संस्कृती व पारंपरिक खेळांची माहिती व्हावी, यासाठी बाहुला- बाहुलीच्या लग्नाचे बालजगत डे केअरने आयोजन केले होते. या बाहुला-बाहुलीच्या लग्न सोहळ्यात बालकांसह त्यांचे पालक व नातेवाईक मंडळीही सहभागी झाली होती.
लग्न सोहळ्यात ज्या पद्धतीने विधी व कार्यक्रम घेतले जातात, त्याच पद्धतीचे आयोजन येथेही करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात पहिल्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम, दुसऱ्या दिवशी हळद तसेच तिसऱ्या दिवशी संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेवटच्या दिवशी बालजगत डे केअर परिसरात भव्य मांडव टाकून सजावट करण्यात आली होती. ठरलेल्या मुहूर्तावर बाहुला-बाहुलीला सजवून तयार करण्यात आले. बच्चे कंपनी तसेच त्यांचे पालकही पारंपरिक वस्त्र परिधान करून लग्नात सहभागी झाले. परिसरातून बॅण्डबाजासह बाहुल्यांची वरात काढण्यात आली. वरातीमध्ये बच्चे कंपनीसह पालकांनी नृत्य केले. तिकडे वधू झालेली बाहुलीही नवरीच्या वस्त्रात तयार होऊन वाट पाहत होती. वरात मांडवात पोहोचल्यावर वर वधूला खुर्चीवर बसविण्यात आले. नंतर मंगलाष्टक म्हणून लग्नाचा धुमधडाका वाजवला आणि वन्हाड्यांनीही आपल्या हातातील अक्षता वधू-वरावर टाकल्या.
बाहुला-बाहुलीचे लग्न आटोपताच बालकांच्या आवडीची मेजवानीही देण्यात आली. बाहुला-बाहुलीच्या या लग्न सोहळ्यात जवळपास मोठ्या संख्येने कुटंबांनी सहभाग घेतला. आनंदात पार पडलेल्या या बाहुला- बाहुलीच्या लग्न सोहळ्यातून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
लहानपणीचा आवडीचा विषय
पूर्वी लहानपणीच्या खेळात बाहुला-बाहुलीचे लग्न हा आवडीचा कार्यक्रम असायचा. मात्र, आज मोबाइलच्या युगात जुने पारंपरिक खेळ लोप पावत चालले आहेत. या खेळांची उजळणी व्हावी तसेच बालकांना याबाबतची माहिती व्हावी, हा उद्देश ठेवून संचालिका प्रणोती वैद्य यांनी या खेळांचे आयोजन केले.