गोंदिया - चंद्रपूर रेल्वेमार्गाच्या डबललाइनचे काम रखडलेलेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 13:36 IST2024-09-30T13:33:31+5:302024-09-30T13:36:01+5:30
Chandrapur : आणखी किती दिवस करावी लागणार प्रवाशांना प्रतीक्षा

The work of double line of Gondia-Chandrapur railway has been stalled
घनश्याम नवघडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : दोन वर्षांपूर्वी गोंदिया- नागभीड चंद्रपूर या रेल्वेमार्गाच्या डबललाइनच्या कामाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. मात्र लाइनच्या विस्ताराची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे प्रवाशांना या डबललाइनच्या कामाची अजूनही प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
७ जानेवारी २०२३ रोजी रेल्वेचे वरिष्ठ मंडल प्रबंधक मनिंदर उपल यांनी नागभीड जंक्शनला भेट दिली होती. तेव्हा पदाधिकारी आणि पत्रकार यांच्याशी अनौपचारिक चर्चा करताना डबललाइनच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती दिली होती.
गोंदिया-बल्लारशाह हा जवळजवळ २५० किलोमीटर अंतराचा रेल्वे मार्ग आहे. सध्या या मार्गावर अनेक प्रवासी गाड्यांचे अवागमन सुरू आहे. अनेक एक्सप्रेस गाड्याही या मार्गावर सुरू आहेत. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांतील रेल्वेची अनेक स्थानके या मार्गावर असून रोज हजारो प्रवासी या मार्गाने प्रवास करतात. या मार्गाने केवळ प्रवासी गाड्याच नाही तर भोपाळ, इंदोर, भिलाई, शालीमार, सिकंदराबाद येथून मोठ्या प्रमाणावर मालगाड्या जात व येत आहेत. गोंदिया बल्लारशाह या रेल्वे मार्गावर दिवसभरातून २५ ते ३० मालगाड्या धावत असल्याने या मार्गावरील प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या चांगल्याच प्रभावित 9000 झाल्या आहेत. या मालगाड्यांमुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या दोन ते तीन तास उशिरा धावत आहेत. एखादी मालगाडी एक दीड तासांनी सुटणार असेल तर एक्सप्रेस गाडी व पॅसेंजर गाडीला आहे त्याच ठिकाणी थांबविले जाते आणि प्रवाशांना ताटकळत राहावे लागते.
तर अनेक समस्या सुटतील
असे प्रकार टाळण्यासाठी रेल्वेने या मार्गावर डबल लाइन टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या तरी या मार्गावरील डबल लाइनच्या सर्वेक्षणानंतर डबल लाइनच्या विस्ताराची कोणतीही हालचाल दिसत नाही. या मार्गावर रेल्वेची डबललाइन झाली तर अनेक समस्या निकाली निघणार आहेत. खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी या समस्येला वाचा फोडावी अशी मागणी केली जात आहे.
"खासदार म्हणून निवडून आल्यानंतर या भागाचा दौरा करीत असताना अनेक कार्यकर्त्यांनी या समस्येचा पाढा वाचला आहे. लवकरच मी गोंदिया-बल्लारशा या डबल लाइनच्या कामाची माहिती घेणार आहे आणि पुढील पाठपुरावा करणार आहे."
- डॉ. नामदेव किरसान, खासदार, गडचिरोली चिमूर