वादळामुळे १२१ फूट टॉवर घरावर कोसळले, सुदैवाने जीवितहानी टळली
By परिमल डोहणे | Updated: April 22, 2023 15:05 IST2023-04-22T15:03:59+5:302023-04-22T15:05:27+5:30
वडगाव प्रभागातील गायत्रीनगर येथील घटना

वादळामुळे १२१ फूट टॉवर घरावर कोसळले, सुदैवाने जीवितहानी टळली
चंद्रपूर : शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या सुसाट वाऱ्याने आयडिया कंपनीचा १२१ फूट उंच असलेला टाॅवर चुंद्री यांच्या घरावर कोसळला. ही घटना वडगाव प्रभागातील गायत्रीनगर येथे घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टॉवर घरावर कोसळल्याने घरमालक श्रीनाथ चुंद्री यांचे मोठे नुकसान झाले आहे.
वडगाव प्रभागातील गायत्रीनगर येथे १२१ फूट उंच आयडिया कंपनीचा टॉवर बसविला होता. या टॉवरशेजारीच चुंद्री यांचे घर आहे. शुक्रवारी सकाळपासून चंद्रपुरात उन्हाचा पारा वाढला होता. परंतु, सायंकाळी ६ वाजेपासून वातावरणात अचानक बदल झाला. त्यानंतर काही वेळाने सुसाट वारा सुटला. आभाळ दाटून आले, विद्युत पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी पाऊसही कोसळला. दरम्यान, गायत्रीनगरातील आयडिया कंपनीचा १२१ फूट उंच असलेला टॉवर श्रीनाथ चुंद्री यांच्या घरावर कोसळला. घरी सर्वजण होते. परंतु, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, चुंद्री यांचे मोठे नुकसान झाले.