शिक्षकांनो, प्रचारात सहभागी होऊ नका! शिस्तभंगाची होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 15:05 IST2024-11-08T15:03:31+5:302024-11-08T15:05:08+5:30
Chandrapur : राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना उच्च शिक्षण विभागाने निर्देश

Teachers, don't get involved in propaganda! Disciplinary action will be taken
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निर्देश उच्च शिक्षण विभागाने राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना दिले आहेत. उच्च शिक्षण संचालनालयाकडून याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. पहिल्यांदाच असे निर्देश शैक्षणिक संस्था, विद्यापीठांना देण्यात आले आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यानुसार आचारसंहिता नियमाचे पालन करण्याबाबतचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्यातील विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सामाईक परिनियम अस्तित्वात येईपर्यंत महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तरतुदी लागू केल्या आहेत. त्यानुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य होता येणार नाही. त्यांच्याशी संबंध ठेवता येणार नाही. तसेच कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा कामात भाग घेता येणार नाही असे परिपत्रकात नमूद केले आहे.
कठोर कारवाईचा इशारा
कोणताही कर्मचारी विधानसभा किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणुकीत प्रचार करू शकणार नाही. हस्तक्षेप करू शकणार नाही. त्यासंबंधी आपले वजन खर्च करू शकणार नाही किवा त्यात भाग घेऊ शकणार नाही. त्यामुळे विद्यापीठ किवा संलग्न महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक कामात, प्रचारात सहभाग घेतल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट केले आहे.