Supriya Sule: 'मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाही, पण 2024 ची निवडणूक बारामतीतून लढवणार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 15:49 IST2022-06-06T15:49:09+5:302022-06-06T15:49:47+5:30
सुप्रिया सुळे यांनी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली

Supriya Sule: 'मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाही, पण 2024 ची निवडणूक बारामतीतून लढवणार'
चंद्रपूर - महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून अनेकदा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेंचं नाव चर्चेत असतं. भाजपकडून पंकजा मुंडेंचंही नाव महिला मुख्यमंत्री म्हणून यापूर्वी पुढे आलं होतं. मात्र, राज्याच्या राजकारणात अजित पवार यांचं स्थान बळकट असल्याने राष्ट्रवादीकडून अजित पवार हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जातात. आता, याबाबत स्वत: सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केलं आहे. मी पदासाठी कोणतेही काम करत नसल्याचं त्यांनी म्हटलं.
सुप्रिया सुळे यांनी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आमदार जोरगेवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीला राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्त्व आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व अपक्ष आमदारांची मंगळवारी भेट घेणार आहेत. तत्पूर्वी सुळे यांनी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आ. जोरगेवार यांच्या मातोश्री 'अम्मा' यांची भेट घेत चंद्रपूर मतदारसंघात त्यांनी राबविलेल्या विविध कल्पक योजनांची माहितीही सुळे यांनी करून घेतली.
महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मला पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदार संघातून तिकिट द्यावे, अशी मागणी करणार असल्याचं सुळे यांनी म्हटलं. आपण 2024 ची लोकसभा निवडणूक बारामती येथूनच लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर, मी पदासाठी कोणतेही काम करत नाही. मुख्यमंत्री पदासाठी आपण इच्छुक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमदार आशीष जयस्वाल यांनी मंत्री विकासकामांसाठी टक्केवारी मागतात, असा आरोप केला. त्यावर प्रतिक्रिया देताना हे गंभीर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या आईच्या भेटीनंतर सुळे यांनी समाधान व्यक्त केले. कर्तृत्ववान महिलेच्या पोटी आलेल्या कर्तृत्ववान मुलाचे काम पाहताना अभिमान वाटल्याचं त्यांनी म्हटलं. या कौटुंबिक भेटीच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी जोरगेवार यांची नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे. राज्याच्या राजकारणात काही गोष्टी 'दिलसे' कराव्या लागतात, असेही त्या म्हणाल्या. राज्यसभा निवडणुकीत मविआ बॅकफूटवर असल्याची स्थिती असताना खा. सुळे यांनी आ. जोरगेवार यांच्यासाठी कुठला संदेश आणलाय, याची चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे.