सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदाचा पत्ता कट; भाजपचे पाच आमदार असूनही मंत्रिमंडळात जिल्ह्याला मंत्रिपद नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:33 IST2024-12-16T12:31:11+5:302024-12-16T12:33:26+5:30

नागरिकांत नाराजी : पालकमंत्री जिल्ह्याबाहेरील असणार?

Sudhir Mungantiwar's ministerial post has been cut; Despite having five BJP MLAs, the district does not have a ministerial post in the cabinet | सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदाचा पत्ता कट; भाजपचे पाच आमदार असूनही मंत्रिमंडळात जिल्ह्याला मंत्रिपद नाही

Sudhir Mungantiwar's ministerial post has been cut; Despite having five BJP MLAs, the district does not have a ministerial post in the cabinet

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर :
मतदारांनी सहा विधानसभा पैकी पाच आमदारांच्या झोळीत मतांचे दान टाकून दणदणीत विजय मिळवून दिला. पाचही आमदार भाजपचे आहेत. मात्र राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिपदापासून पत्ता कट करत चंद्रपूर जिल्ह्याला डावलल्याने समर्थकांना प्रचंड धक्का बसला आहे.


विदर्भातील नागपूर नंतर चंद्रपूर देखील सत्ताकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. विधानसभा निवडणुकीत विजयाची दोन-तीन टर्म पूर्ण केली तरी राज्याचे राजकीय संतुलन बिघडू नये म्हणून चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद देण्याचा मोठेपणा राज्यातील शीर्षस्थ नेत्यांनी घेतल्याची उदाहरणे आहेत. राज्याच्या आजपर्यंतच्या राजकारणात चंद्रपूर जिल्ह्याची भूमिका प्रभावशाली राहिल्याचा इतिहास आहे. मग ते काँग्रेस असो की भाजपचा सत्ताकाळ. उद्योग जिल्हा म्हणून चंद्रपूरने राज्याच्या अर्थकारणात महसूलच्या रूपाने मोठे योगदान दिले.


२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतील भाजपने इतिहास घडविला. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रपुरातून किशोर जोरगेवार, चिमूरातून बंटी भांगडिया, वरोरातून करण देवतळे तर राजुरा मतदारसंघातून देवराव भोंगळे हे पाच आमदार विजयी झाले. सहापैकी केवळ ब्रह्मपुरीची एकमेव जागा काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी जिंकली. विदर्भातील विधिमंडळ राजकीय इतिहासात सातव्यांदा आमदार होणारे सुधीर मुनगंटीवार हेच एकमेव नेते आहेत. 


भांगडिया यांनी तिसऱ्यांदा तर जोरगेवार यांनी दुसऱ्यांदा विजय मिळविला. मात्र महायुतीतील भाजपला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही दिग्गज नेते मुनगंटीवार यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आले. सहापैकी पाच आमदार भाजपचे असताना जिल्ह्याच्या वाट्याला भोपळा मिळाल्याने प्रचंड नाराजी उमटत आहे. 


लवकरच मोठी जबाबदारी ? 
सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. मात्र लवकरच त्यांना भाजप हायकमांडकडून मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे, अशीही चर्चा भाजपा वर्तुळात सुरु असल्याचे समजते.


आता बाहेरचा पालकमंत्री ?
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील मंत्र्यांकडे होते. यावेळी मात्र मंत्रिमंडळात जिल्ह्याला स्थान नसल्याने पालकमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे याची चर्चा आता सुरु झाली आहे. जिल्ह्यातील भाजपा आमदारांची संख्या लक्षात घेता भाजपचाच पालकमंत्री होईल असे संकेत आहेत. 


भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ

  • जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आले आहेत. मंत्रिमंडळात भांगडिया किंवा जोरगेवार यांच्यापैकी एकाला संधी मिळेल, अशी आशा भाजप कार्यकर्ते व्यक्त करीत होते.
  • या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यापैकी मुनगंटीवार मंत्री होतील, अशी अपेक्षा सर्वांनाच होती ती फलद्रुप न झाल्याने त्यामुळे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झाल्याची माहिती आहे.


१९९० नंतर प्रथमच जिल्ह्याला डावलले
१९९० नंतर प्रथमच जिल्ह्याला राज्याच्या मंत्रिमंडळात भोपळा मिळाला आहे. चंद्रपूर जिल्हा हा भाजपचे अभ्यासू नेते आमदार मुनगंटीवार यांच्या मंत्रिमंडळातील आजवरच्या प्रभावी कामगिरीमुळे ओळखला जातो. राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय असो, की वाघांच्या स्थलांतरणाचा विषय, मुनगंटीवार यांनी आपल्या कामाची छाप सोडली. शिलकीचे अंदाजपत्रक सादर करणारे एकमेव अर्थमंत्री म्हणूनही मुनगंटीवार यांच्याकडे बघितले जाते. 

Web Title: Sudhir Mungantiwar's ministerial post has been cut; Despite having five BJP MLAs, the district does not have a ministerial post in the cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.