घुग्घुसमध्ये उद्यानाचे शेड कोसळले, विद्यार्थिनी गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 15:19 IST2023-03-28T15:18:20+5:302023-03-28T15:19:11+5:30
यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे

घुग्घुसमध्ये उद्यानाचे शेड कोसळले, विद्यार्थिनी गंभीर
घुग्घुस : दोन वर्षांपूर्वी घुग्घुस ग्रामपंचायतीच्या परिसरात कोट्यवधी रुपये खर्चून दहा उद्यान उभारण्यात आले आहे. मात्र, यातील तीन उद्यानाचे शेड एकाच आठवड्यात कोसळल्याची घटना घडली. दरम्यान, सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान, सुभाष नगर परिसरातील सुभाषचंद्र बोस उद्यानातील शेड कोसळल्याने ११ वर्षीय विद्यार्थिनी जखमी झाली. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
बालक, वृद्ध नागरिकांसाठी सोयीचे व्हावे यासाठी घुग्घुसमध्ये विविध ठिकाणी उद्यान तयार करण्यात आले आहे. मात्र, निकृष्ट कामामुळे उद्यानाचे शेड कोसळत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहे. सोमवारी सुभाषचंद्र बोस उद्यानातील शेड कोसळल्याने लक्ष्मी गंगाधरे ही विद्यार्थिनी जखमी झाली. तिला वेकोलिच्या राजीव गांधी केंद्रीय चिकित्सालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तिच्या जवळच असलेल्या अन्य दोन विद्यार्थिनी सुदैवाने बचावल्या. उद्यानाचे काम करणाऱ्या कंत्राटदावार गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात ठाणेदाराला निवेदन देण्यात आले आहे.