'युतीच्या राजकारणात कधी कधी त्याग करावा लागतो' ; मुनगंटीवार यांच्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 15:54 IST2026-01-05T15:54:12+5:302026-01-05T15:54:48+5:30
Chandrapur : युतीच्या राजकारणात काही वेळा पदे बाहेरच्यांना द्यावी लागतात. त्यामुळे काही नेते आणि कार्यकर्त्यांवर अन्याय झाला हे खरे. मात्र, काही त्याग करावे लागतात, असे सूचक विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

'Sometimes sacrifices have to be made in coalition politics'; Chief Minister's suggestive statement regarding Mungantiwar
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : युतीच्या राजकारणात काही वेळा पदे बाहेरच्यांना द्यावी लागतात. त्यामुळे काही नेते आणि कार्यकर्त्यांवर अन्याय झाला हे खरे. मात्र, काही त्याग करावे लागतात, असे सूचक विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मंत्रिपद न मिळाल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले.
चंद्रपुरातील भाजपमध्ये कोणतेही वाद नाहीत. एखाद्या मुद्द्यावर मतभेद होऊ शकतात. मात्र, मनभेद नाहीत. सर्व नेते आणि कार्यकर्ते एकत्र आहेत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय संकल्प यात्रेनंतर माध्यमांशी संवाद साधताना रविवारी (दि. ४ जानेवारी) त्यांनी चंद्रपुरातील राजकीय परिस्थितीवर स्पष्ट भूमिका मांडली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, तर किशोर जोरगेवार हे आमदार आहेत. या ठिकाणी कुठेही वाद नाही. आज चंद्रपुरात जो विकास दिसतो आहे, त्यामध्ये मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि जोरगेवार यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या तसेच भाजपशिवाय दुसऱ्या कुणीही या शहरात विकास केल्याचे दाखवू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत चंद्रपूरला प्रचंड मोठा विजय मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील वादाच्या चर्चा मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावल्या.
मनसे कारणे शोधतेय...
६६ उमेदवार अविरोध निवडून आल्याच्या मुद्द्यावर मनसे न्यायालयात जाणार असल्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला. मनसेने खुशाल कोर्टात जावे. आम्हाला जनतेच्या कोर्टाने निवडून दिले आहे. जनतेच्या कोर्टाचा फैसला कायम राहील, असे ते म्हणाले. अविरोध निवडून आलेल्यांमध्ये भाजपसोबतच अपक्ष आणि इतर पक्षांचे उमेदवारही आहेत. मात्र, त्यावर बोलले जात नाही. पराभव स्पष्ट दिसत असल्याने कारणे शोथली जात आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.