चंद्रपूर किडनी रॅकेटचे चीनी कनेक्शन; महाराष्ट्र एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 21:10 IST2025-12-28T21:09:03+5:302025-12-28T21:10:16+5:30
Chandrapur Kidney Racket: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक खुलासा झाला आहे.

चंद्रपूर किडनी रॅकेटचे चीनी कनेक्शन; महाराष्ट्र एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक खुलासा झाला आहे. या रॅकेटचे धागेदोरे थेट चीनशी जोडलेले असल्याचे महाराष्ट्र एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले. केवळ देशांतर्गत नव्हे, तर हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट असून, आतापर्यंत किमान १६ जणांच्या किडनींची विक्री झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सोलापूरचा 'डॉ. कृष्णा'उर्फ रामकृष्ण सुंचू आणि चंदीगडचा हिमांशू भारद्वाज या दोन मुख्य आरोपींनी दिलेल्या जबाबातून असे स्पष्ट झाले आहे की, भारतातून काढलेल्या किडन्या या प्रामुख्याने चिनी रुग्णांमध्ये यशस्वीरित्या प्रत्यारोपित करण्यात आल्या. डॉ. चियांग' नावाचा चिनी सर्जन या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे, जो कंबोडियामध्ये शस्त्रक्रिया करायचा, यासाठी डॉ.कृष्णा आणि हिमांशू भारद्वाज यांना कमिशन मिळायचे. या टोळीने आतापर्यंत १६ जणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची किडनी विक्री केली असावी, असा पोलिसांना संशय आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील रोशन कुळे याने एका सावकऱ्याकडून १ लाखाचे कर्ज घेतले होते. जे व्याजासह तब्बल ७४ लाख रुपयांपर्यंत पोहोचले. सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी हिमांशू भारद्वाज आणि डॉ. कृष्णा यांनी रोशनला आपल्या जाळ्यात ओढून किडनी विकण्याचा आणि सावकराचे पैसे फेडण्याचा सल्ला दिला. या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर एसआयटीला हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे समजले. या रॅकेटमध्ये आणखी किती डॉक्टर्स, दलाल आणि सावकार सामील आहेत, याचा शोध एसआयटी घेत आहे. हे रॅकेट कंबोडियामार्गे चीनमधील रुग्णांपर्यंत कसे पोहोचत होते आणि या आर्थिक व्यवहारांची साखळी नेमकी कशी आहे? याचाही तपास सुरू आहे.