वडेट्टीवारांचे कट्टर समर्थक राजीव रेड्डी हेच अखेर नगर परिषद उपाध्यक्षपदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 20:32 IST2026-01-08T20:31:53+5:302026-01-08T20:32:14+5:30
बड्या नेत्याला हादरा : दीप्ती सोनटक्के नगराध्यक्षपदी विराजमान

Rajiv Reddy, a staunch supporter of Vadettiwar, is finally the vice-president of the Municipal Council.
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घूस : नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत असताना उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत घमासान बघायला मिळाले. अखेर पक्षनिष्ठा बाळगून असलेले नवनिर्वाचित नगरसेवक राजीव रेड्डी यांचीच बुधवारी झालेल्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी निवड झाली. निवडणुकीनंतर जल्लोष करण्यात आला. यावेळी काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थित होते. या घडामोडीला तीव्र विरोध असलेल्या काँग्रेसच्याच एका बड्या नेत्याला मोठा हादरा बसल्याची चर्चा काँग्रेस गटात सुरू झाली.
राजीव रेड्डी हे काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक असून, घुग्घूसमध्ये त्यांनीच काँग्रेस जिवंत असल्याचाही सूर यावेळी उमटत होता. नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे नगराध्यक्ष आणि २२ पैकी नगरसेवक पदांच्या ११ जागांवर विजय मिळविला होता. या निवडणुकीची सर्वस्वी धुरा राजीव रेड्डी यांच्या खांद्यावर होती. यामुळे रेड्डी यांचीच उपाध्यक्षपदी वर्णी निवड व्हावी, असे एकंदर चित्र निर्माण झाले होते. मात्र काँग्रेसच्याच एका बड्या नेत्याने रेड्डी यांच्या नावाला विरोध दर्शवून दोन नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नगरसेवक रविश सिंग यांना उपाध्यक्षपद द्यावे, असा आग्रह धरला. इतकेच काँग्रेसचा गट स्थापन झाला असताना काँग्रेसच्या काही नगरसेवकांना हाताशी धरून सोमवारी (दि. ५) जिल्हाधिकाऱ्यांकडे काँग्रेसच्या १४ सदस्यांच्या गटातून बाहेर पडत असल्याचे पत्रही दिले होते.
मात्र यात यश न आल्याने व्हीपच्या आधारे अखेर राजीव रेड्डी यांच्या उपाध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला. काँग्रेसकडून राजीव रेड्डी व रोशन पचारे यांनी तर भाजपकडून गणेश पिंपळकर यांनी उपाध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केले होते. अखेर पचारे यांनी आपले नामांकन मागे घेतले. रेड्डी आणि पिंपळकर यांच्यात लढत होऊन रेड्डी यांनी २३ पैकी १६ मते घेत विजय मिळविला. पक्षातील घडामोडींमुळे आमदार विजय वडेट्टीवार खुद्द घुग्घूसमध्ये दाखल झाले होते.